चामोर्शी (गडचिराेली) : मका पिकाला पाणी देण्याकरिता शेतात गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना चामाेर्शी तालुक्याच्या गणपूर रै. येथे शनिवार, १ मार्च राेजी दुपारी चारच्या सुमारास घडली.
संतोष भाऊजी राऊत (वय ४७) गणपूर रै. असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. संताेष राऊत यांनी आपल्या शेतात मक्याची लागवड केलेली आहे. नेहमीप्रमाणे ते पिकाला पाणी लावण्याकरिता शनिवारी दुपारच्या सुमारास शेतात गेले हाेते. दरम्यान, शेतातच दबा धरून बसलेल्या वाघाने संतोष यांच्यावर हल्ला करून ठार केले. सायंकाळ हाेऊनही ते घरी परत न आल्यामुळे कुटुंबीयांनी शेतीच्या दिशेने धाव घेतली. तेव्हा शेतातच त्यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला.
परिसरात वाघाच्या पाऊलखुणा हाेत्या. याबाबतची माहिती वन परिक्षेत्र मार्कंडा कं. व चामाेर्शी पाेलिसांना देण्यात आली. वन विभाग व पाेलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आलापल्ली वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुलसिंग टोलिया यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक आझाद, मार्कंडा कं. चे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. बी. इनवते, परविक्षाधीन वनपरिक्षेत्र अधिकारी वानगे, काेनसरीचे क्षेत्रसहायक आत्राम, गुंडापल्लीचे आर. एल. बानोत करीत आहेत. घटनास्थळी चामोर्शीचे पोलिस निरीक्षक अमुल कादबाने दाखल झाले होते.मृत संतोष राऊत यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आहे. घरातील कर्ता व्यक्ती कायमचा पडद्याआड झाल्याने कुटुंबावर शाेककळा पसरली आहे. दरम्यान, वनविभागाने ५० हजार रुपयांची सानुग्रह मदत राऊत कुटुंबाला दिली, अशी माहिती वन परिक्षेत्र अधिकारी आर. बी. इनवते यांनी दिली.