पोटे यांचे आवाहन : २ आॅगस्टपर्यंत प्रस्ताव पाठवा गडचिरोली : खरीप हंगाम २०१६ पासून राज्यात लागू करण्यात आलेली प्रधानमंत्री पीक विमा योजनेला २ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या पीक विमा योजनेत अर्ज करून सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे यांनी केले आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहित करणे या उद्देशाने प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. सदसर प्रधानमंत्री पीक विमा योजना अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. खातेदाऱ्याच्या व्यतीरिक्त कुडाणे किंवा भाडेपट्टीने शेती करण्यास शेतकरी या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र आहेत. धान पिकासाठी प्रतिहेक्टरी ३९ हजार रूपये विमा संरक्षित रक्कम असून शेतकऱ्यांना पीक विम्याचा हप्ता ७८० रूपये अदा करावा लागणार आहे. अर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै होती. मात्र आता प्रस्ताव करण्यास २ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती पोटे यांनी दिली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
प्रधानमंत्री पीक विमा योजनेस मुदतवाढ
By admin | Updated: August 1, 2016 01:31 IST