गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठासह राज्यातील अनेक विद्यापीठांमध्ये कालबाह्य अभ्यासक्रम सुरू आहेत. सदर अभ्यासक्रम यावर्षीच्या शैक्षणिक सत्रापूर्वी बंद करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्य सचिव जे. एस. सहारीया यांच्या प्रमुख उपस्थितीत कुलगुरू व कुलसचिवांची बैठक २३ एप्रिल रोजी मुंबई येथे पार पडली. या बैठकीमध्ये कालबाह्य अभ्यासक्रमासह विद्यापीठांच्या इतर समस्यांवर प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. भारतामध्ये शेकडो विद्यापीठे आहेत. यातून लाखो विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत. मात्र विद्यापीठांच्या गुणवत्तेविषयी नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातो. मागील अनेक वर्षापासून पारंपरिक अभ्यासक्रम शिकविले जात आहेत. बदलत्या काळानुसार या अभ्यासक्रमाचा काहीच फायदा नाही. मात्र सदर अभ्यासक्रम शिकण्यासाठी विद्यार्थ्यांचा वेळ व शासनाचा पैसा खर्च होत आहे. विद्यापीठातून घेतलेली पदवी भविष्यात त्याला पाचही रूपये कमवून देत नाही. त्यामुळे त्याला जीवनभर बेरोजगारीचे चटके सहन करावे लागतात. ही बाब शासनाच्या लक्षात आली आहे. गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत एकूण ५७ अभ्यासक्रम चालविले जातात. यातील काही अभ्यासक्रम निश्चितच कालबाह्य झाली आहेत. ही अभ्यासक्रम बदलविली जाणार आहेत. या अभ्यासक्रमांऐवजी व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्यावर विद्यापीठांचा भर राहणार आहे. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठातील नेमके कोणते अभ्यासक्रम बंद होणार आहेत. याकडे विद्यार्थी व प्राध्यापक वर्गाचे लक्ष लागले आहे. सदर अभ्यासक्रम बंद केल्यास तो अभ्यासक्रम शिकविणार्या प्राध्यापकांचे काय होणार, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. पदवी घेऊन विद्यापीठाच्या बाहेर पडलेला विद्यार्थी बेरोजगारीचा सामना करू नये, यासाठी जुने अभ्यासक्रम बदलवून नवीन अभ्यासक्रम सुरू करावे, अशी मागणी विद्यार्थी, पालक, विद्यार्थी व शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांकडून केली जात होती. याला आता मूर्त स्वरूप प्राप्त होणार आहे. (नगर प्रतिनिधी)
कालबाह्य अभ्यासक्रम बंद होणार
By admin | Updated: May 12, 2014 23:39 IST