संदीप पाटील : बदली झालेल्या पोलीस निरीक्षकांना निरोपगडचिरोली : गडचिरोलीसारख्या नक्षल प्रभावीत जिल्ह्यात पोलीस विभागात काम करताना पोलीस निरीक्षकांना महत्त्वाचे अनुभव आले. कामाच्या अनुभवाची शिदोरी नेहमी पोलीस निरीक्षकांच्या पाठीशी राहील, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले.सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात आयोजित निरोप समारंभ कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी मंचावर अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) प्रणय अशोक, अहेरीचे अप्पर पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे, उपविभागीय पोलीस अधिकारी ईलमकर आदी उपस्थित होते. यावेळी गडचिरोली जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात बदली झालेल्या पाच पोलीस निरीक्षकांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये पोलीस निरीक्षक शशिकांत पवार, संतोष गिरीगोसावी, अण्णासाहेब मांजरे, नरेंद्र मोरे, गणेश उगले आदींचा समावेश होता. तसेच ३१ मे २०१५ रोजी सेवानिवृत्त झालेले पोलीस उपनिरीक्षक बोंद्रे यांनाही शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण निरोप देण्यात आला. याप्रसंगी जिल्हा बाहेर बदली झालेले पाचही पोलीस निरीक्षक व सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक बोंद्रे यांनी गडचिरोली जिल्ह्यात काम करताना आलेले अनुभव मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन महिला पोलीस उपनिरीक्षक तेजस्वी पाटील यांनी केले तर आभार उपविभागीय पोलीस अधिकारी ईलमकर यांनी मानले. याप्रसंगी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी समायोचित भाषणे केली. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
अनुभवाची शिदोरी पाठीशी राहील
By admin | Updated: June 3, 2015 01:58 IST