गडचिरोली : जिल्ह्यात सिंचन क्षेत्र वाढून दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत सिंचनाची एकूण ९८ कामे गतवर्षीपासून हाती घेण्यात आली आहे. या कामावर आतापर्यंत ५८६.७७ लक्ष रूपयांचा निधी खर्च झाला असून सदर कामे पूर्ण होण्यासाठी पुन्हा लघु पाटबंधारे विभागाला ७९४.९७ लक्ष रूपयांचा निधी लागणार असल्याची माहिती मिळाली आहे. जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत ५०० हून अधिक कोल्हापुरी बंधारे आहेत. मात्र यापैकी अर्ध्याअधिक बंधाऱ्यांचे लोखंडी प्लेट गायब झाले आहेत. तसेच अनेक बंधारे लिकेज असून त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनीपर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. या सर्व बाबीवर उपाययोजना करण्यासाठी जि. प. लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने सिंचन योजना व कोल्हापुरी बंधाऱ्याच्या दुरूस्तीचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय कृषी व जलसंधारण विभागाच्या वतीने बंधारे व उपसा सिंचन योजनेची कामे सुरू आहेत. मात्र या कामात गती नसल्याचे दिसून येते. जि. प. लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने २०१४-१५ या वर्षात सात लघु पाटबंधारे तलाव, दोन गावतलाव, ८१ कोल्हापुरी बंधारे व आठ उपसा सिंचन योजना, अशी एकूण ९८ कामे घेण्यात आली. सात लघु पाटबंधारे तलावाची मूळ अंदाजपत्रकीय किंमत ७८.३८ होती. मात्र सुधारित किंमत १२९.३२ लक्ष आहे. दोन गावतलावाची मूळ सुधारित किंमत सारखीच असून ती १३.८३ लक्ष होती. ८१ कोल्हापुरी बंधाऱ्याची सुधारित किंमत १०३७.१७ लक्ष आहे. आठ उपसा सिंचन योजनेची मूळ अंदाजपत्रकीय किंमत १४५.९२ लक्ष रूपये आहे. मात्र सदर कामे हाती घेण्यासाठी बराच कालावधी लागल्याने या सिंचन योजनेच्या कामाची किंमत वाढली. आठ उपसा सिंचन योजनेची सुधारित अंदाजपत्रकीय किंमत १६८.७६ आहे. लघु पाटबंधारे तलाव, गाव तलाव, कोल्हापुरी बंधारे व उपसा सिंचन योजनेच्या एकूण ९८ कामांची सुधारित किंमत १३४९.०८ लक्ष रूपये आहे. यापैकी आतापर्यंत ९८ कामांवर ५८६.७७ लक्ष रूपयांचा खर्च झाला आहे. लघु पाटबंधारे तलावाच्या कामावर ६२.६९ लक्ष, गाव तलावावर ५.६७ लक्ष, कोल्हापुरी बंधाऱ्यावर ४०२.३३ लक्ष, उपसा सिंचन योजनेवर ११६.८ लक्ष रूपयांचा खर्च झाला असल्याची माहिती आहे. आता लघु पाटबंधारे तलावाच्या कामासाठी पुन्हा ६७.३७ लक्ष, गाव तलावाच्या कामासाठी ८.१६ लक्ष, कोल्हापुरी बंधाऱ्याच्या कामासाठी ६३४.८४ लक्ष तर उपसा सिंचन योजनेच्या कामासाठी पुन्हा ८४.६० लक्ष रूपयांचा निधी जि. प. लघु पाटबंधारे विभागाला आवश्यक आहे. विभागाच्या वतीने शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली असून सदर निधी मिळण्याची शक्यता आहे. (स्थानिक प्रतिनिधी)२ हजार ४५ हेक्टर सिंचन क्षेत्र वाढणार४जि. प. लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने सुरू असलेल्या सात लघु पाटबंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता १.१६ दशलक्ष घनमीटर आहे. दोन गाव तलावाची ०.०८ दशलक्ष घनमीटर, ८१ कोल्हापुरी बंधाऱ्याची २.३१ दशलक्ष घनमीटर पाणी साठवण क्षमता आहे. लघु पाटबंधारे तलावाची ५४९.०० हेक्टर क्षेत्र सिंचन क्षमता आहे. ८१ कोल्हापुरी बंधाऱ्यांची ११९५.८० हेक्टर क्षेत्र सिंचन क्षमता आहे. तर ८ उपसा सिंचन योजनांची ३०१ हेक्टर क्षेत्र सिंचन क्षमता आहे. सर्वच ९८ कामे पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यात एकूण २०४५.८० हेक्टर सिंचन क्षमता वाढणार आहे.
सिंचन योजनेच्या कामावर ५८६ लाखांचा खर्च
By admin | Updated: September 15, 2015 03:47 IST