देसाईगंज : पावसाळ्याच्या आगमनाने सर्वप्रथम भाजीपाल्याच्या भावात हमखास वाढ होते़ भाजी बाजारात ग्रामीण भागातील भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने शहरात भाजीपाल्याच्या किंमती वाढतात. त्यामुळे ग्रामीणभागासोबत शहरी भागातील नागरिकदेखील भाजी बाजारात येणाऱ्या रान भाज्यांना पसंती देतात़ पावसाळ्यात सर्वत्र पालेभाज्यांसह जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत़ त्यात खात्रीशीर उत्पन्न नसणाऱ्या ग्रामीण भागातील लोकांचे प्रचंड हाल होतात. अत्यल्प उत्पन्न असणाऱ्या वर्गाला रोजचा बाजार तर दूरच आठवडी बाजारात जाणे आर्थिक अडचणीमुळे शक्य होत नाही़ या महागाईच्या फोडणीत सर्वजण होरपळत आहेत. मात्र बाजारात येणाऱ्या कुळ्याचे फूल, शेरडीरे, पिंगफळाचा बार भश्यालचे पाने अशा अस्सल रान भाज्यांची चव चाखायला मिळते़ १०० ते २०० रूपये किलोच्या भाज्या घेण्यापेक्षा या रानभाज्या नागरिकांच्या पसंतीला उतरत आहेत़जुन्या जाणत्या मंडळींचा या भाज्या ओळखण्यात विशेष हातखंडा आहे़ मात्र नवीन पिढीला याबाबत काहीच माहिती नाही. या भाज्यांचे अस्तित्व दाट जंगल डोंगराळ भागात व शेत जमिनीवर ओलिताच्या भागात आढळते़ शेतात दैनंदिन कामाला गेल्यावर फावल्या वेळात ही मंडळी जंगलातून रानभाजी सायंकाळी घरी घेऊन येतातच़ वैविध्यपूर्ण नाव असलेल्या भाज्यांचा हा खजिना ग्रामीण भागातील लोकांचा काही दिवस तरी आधार बनतो़ रबीत पेरलेल्या हरभऱ्यांची सवंगणी झाल्यानंतर जमिनीत राहिलेले हरभऱ्याचे दाणे पावसाळ्यात निघतात़ ती भाजी म्हणून पावसाळ्यात मजूर वर्ग वापरतात़ महागाईच्या तडाख्यात थोडाफार आधार देणाऱ्या या भाज्या लावणी- पेरणीच्या धामधुमीत दुर्गम भागात ज्यांचा पावसात बाजारपेठेशी संबंध येत नाही अशा लोकांचा आधार आहेत. जंगलाचा होत असलेला ऱ्हास, लावण्यात येत असलेल्या वणव्यांमुळे या वनस्पतीचेही प्रमाण कमी होऊ लागले आहे़ त्यामुळे या भाज्यांच्या संवर्धनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. (वार्ताहर)
महागाईत रानभाज्यांकडे कल
By admin | Updated: July 23, 2014 00:01 IST