लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आठ ते दहा दिवसांपासून कधी संततधार तर कधी मुसळधार पडणाऱ्या पावसाने अहेरी उपविभागात नदी, नाल्यांना पूर आला होता. अहेरी उपविभागात अतिवृष्टी झाल्यामुळे भामरागडच्या पर्लकोटा नदीला पूर आला होता. दरम्यान पर्लकोटा पुलावरील वाहतूक दोन ते तीन दिवस बंद पडली होती. तसेच आष्टी येथील वैनगंगा नदीला पूर आल्याने चंद्रपूर-आष्टी मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. मात्र पावसाने सोमवारपासून उसंत घेतल्याने पूर परिस्थिती ओसरून जनजीवन पूर्वपदावर आले आहे. आता ग्रामीण भागात धानपीक रोवणीच्या कामाला वेग आला आहे.२७ जुलैपासून ३ आॅगस्टपर्यंत संततधार पाऊस जिल्हाभरात बरसला. ४ आॅगस्टला पावसाने उसंत दिली. त्यानंतर पुन्हा वातावरणात बदल घडून नागपंचमीच्या दिवशी ५ आॅगस्टला दुपारनंतर जिल्ह्याच्या विविध भागात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. संततधार पावसामुळे धानपिकाची रोवणी व शेतातील इतर कामे खोळंबली होती. मात्र पुन्हा मंगळवारी पावसाने उसंत घेतली. मंगळवारी गडचिरोली शहरास जिल्ह्याच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. मात्र या पावसाने पूर परिस्थिती निर्माण झाली नाही. यापूर्वी मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे गडचिरोली, आरमोरी शहरासह अनेक भाग जलमय झाले होते. सखल भागातील वस्त्यांमध्ये पाणी साचल्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. पावसाळ्यातील सुरूवातीच्या तीन नक्षत्रात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. दरम्यान पुनर्वसू नक्षत्रात २७ जुलैपासून पाच ते सहा दिवस संततधार पाऊस बरसला. या पावसाने शेतकऱ्यांसह नागरिकही सुखावले. मात्र पाऊस थांबत नसल्याने नागरिक हैराण झाले होते. मात्र आता पावसाने उसंत घेतल्याने सर्व नागरिकांचा जीव भांड्यात पडला.बड्या शेतकऱ्यांचा गुत्था पद्धतीवर भरसुरूवातीच्या टप्प्यात पाऊस न झाल्याने यावर्षीच्या खरीप हंगामात धान पिकाच्या रोवणीच्या कामास विलंब झाला. दरम्यान पाऊस होताच सर्व शेतकऱ्यांनी एकाच वेळी रोवणीच्या कामास प्रारंभ करण्यासाठी लगबग सुरू केली. मात्र महिला मजूर मिळत नसल्याने जिल्ह्यातील बड्या शेतकऱ्यांनी आपले रोवणी काम गुत्था पध्दतीने हाती घेतले आहे. पऱ्हे खोदणे व रोवणी करणे ही दोन्ही कामे महिला मजूर करीत आहेत. ट्रॅक्टरच्या सहाय्याने चिखलणी करून सकाळपासून महिला मजुरांकडून रोवणीचे काम सुरू आहे. अनेक बड्या शेतकऱ्यांनी यंदा गुत्था पध्दतीवर भर दिला आहे. पुरूष मजुरांचेही मजुरीचे भाव वाढल्याने महिला मजुरांना प्राधान्य दिले जात आहे.
पावसाच्या उसंतीने जनजीवन पूर्वपदावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 22:23 IST
आठ ते दहा दिवसांपासून कधी संततधार तर कधी मुसळधार पडणाऱ्या पावसाने अहेरी उपविभागात नदी, नाल्यांना पूर आला होता. अहेरी उपविभागात अतिवृष्टी झाल्यामुळे भामरागडच्या पर्लकोटा नदीला पूर आला होता. दरम्यान पर्लकोटा पुलावरील वाहतूक दोन ते तीन दिवस बंद पडली होती.
पावसाच्या उसंतीने जनजीवन पूर्वपदावर
ठळक मुद्देरोवणीच्या कामांना वेग : शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा; पूर ओसरला