गडचिरोली : महसूल खात्याच्या नाकावर टिच्चून शहरात मोठ्या प्रमाणात टोलेजंग इमारती उभ्या होत आहेत. या इमारती बांधकामासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. शेतजमिनीवर घराचे बांधकाम करून महसूल विभागाचा कोट्यवधी रूपयांचा कर बुडविला जात आहे. मात्र याकडे जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकार क्षेत्रातील नगर विकास विभागाने दुर्लक्ष चालविले आहे.शहराच्या हद्दीत घराचे बांधकाम करण्यापूर्वी ज्या प्लॉटवर घराचे बांधकाम करण्यात येत आहे. सदर प्लॉट नगर परिषदेच्या मान्यतेने अकृषक करून घेणे आवश्यक आहे. मात्र अकृषक करण्यासाठी नगर परिषदेकडे जवळपास ५० हजार रूपयांचे शुल्क भरावे लागते. त्याचबरोबर अनेक कागदपत्रेही सादर करावी लागतात. यापासून सुटका मिळविण्यासाठी बहुतांश नागरिकांनी प्लॉट अकृषक न करताच घराचे बांधकाम सुरू केले आहे. त्याचबरोबर गडचिरोली शहराच्या सभोवताल असलेली शेत जमीन काही नागरिकांनी घरासाठी विकत घेतली आहे. या जमिनीचे व्यवस्थित प्लॉट पाडण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सदर जमीनही अकृषक होणे अशक्य असल्याने अशा नागरिकांनीही घर बांधकामासाठी परवानगी न घेताच घराचे बांधकाम परस्पर सुरू केले आहे. नगर परिषदेची परवानगी न घेताच शहराच्या हद्दीत घर बांधकाम सुरू असल्याच्या तक्रारी काही नागरिकांकडून प्राप्त झाल्या. त्याचबरोबर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात सदर बांधकाम आल्यानंतर संबंधित घर मालकांना नोटीस बजावून परवानगी घेण्यास बजाविले आहे. जवळपास एका वर्षाच्या कालावधीत २७२ घर मालकांना नोटीस बजावून घरांचे बांधकाम थांबविण्याचे निर्देश दिले होते. मात्र नगर परिषदेच्या नोटीसला न जुमानता बांधकाम सुरूच ठेवले आहे. सदर अवैध बांधकामांमुळे भविष्यात धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सन २००० पूर्वी ज्या प्लॉटची रजिस्ट्री झाली आहे, असे प्लॉट गुंठेवारीच्या माध्यमातून अकृषक करण्यात येतात. मात्र गडचिरोली शहरात २००० नंतर खरेदी केलेले हजारो प्लॉट आहेत. सदर प्लॉट अकृषक करण्यात आले नसले तरी त्यांच्यावर कोट्यवधी रूपये किंमतीच्या टोलेजंग इमारती उभ्या झाल्या आहेत. मात्र नगर परिषदने नोटीस पाठविण्याच्या व्यतिरिक्त दुसरे काहीही केले नाही. परिणामी अवैध बांधकाम वाढून विकास कामासाठी निधी जमा करणे दुरापास्त झाले आहे. चंद्रपूर मार्गावर अनेक व्यावसायिक वापरासाठी होणाऱ्या दुकान गाळ्यांचे बांधकाम सुरू आहे. येथे पार्र्किंगची व्यवस्था ठेवणे गरजेचे आहे. परंतु एकाही बांधकाम करणाऱ्याने पार्र्किंगसाठी जागा सोडलेली नाही. त्यामुळे येथे वावर सुरू झाल्यावर मुख्य रस्त्यावरच पार्र्किंग राहणार आहे. तरीही पालिकेचा डोळेझाकपणा सुरू आहे.
शहरात अवैध इमारत बांधकाम जोरात
By admin | Updated: October 8, 2015 01:04 IST