व्यापाऱ्यांकडून मोहफूल खरेदी बंद : खासदारांनी केल्या एसपींना सूचनाधानोरा : खासदार अशोक नेते मंगळवारी अचानक धानोराच्या दौऱ्यावर आले असता, धानोरा परिसरातील मोहफूल संकलन करणाऱ्या जवळपास दीडशे मजुरांनी त्यांना घेराव घालून मोहफूल कुठे विकायचे, असा प्रश्न केला. पोलिसांच्या विशेष दारूबंदी पथकामुळे खासगी व्यापाऱ्यांनी मोहफुलाची खरेदी बंद केल्यामुळे आदिवासी नागरिकांसमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मोहफुलाची खरेदी व्यापारी करतात, असे खासदार अशोक नेते यांनी मजुरांना सांगितल्यावर जिल्हाभरात पोलीस विभागाच्या विशेष दारूबंदी पथकाद्वारे मोहफूल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली जात असल्याने मोहफूल खरेदी बंद आहे, असे एका मजुराने सांगितले. त्यानंतर लागलीच खासदार नेते यांनी गडचिरोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून हा सर्व प्रकार त्यांना सांगितला. यावर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस विभागातील सर्व अधिनस्त अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देऊन मोहफूल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करू नका, असे निर्देश देण्यात येतील, असे खासदार नेते यांना सांगितले. आदिवासी बहूल गडचिरोली जिल्ह्यात मोहफूल संकलनाचे काम दरवर्षी मोठ्या प्रमाणात होते. या व्यवसायावर अनेक गोरगरीब आदिवासी नागरिक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र पोलिसांच्या कारवाईमुळे खासगी व्यापाऱ्यांनी मोहफुलाची खरेदी बंद केल्यामुळे मजुरांनी प्रचंड पंचाईत झाली. याच प्रश्नावरून मजुरांनी खासदार नेते यांना घेराव घातला. दरम्यान खासदार नेते यांच्या पुढाकाराने व्यापाऱ्यांनी मोहफुलाची खरेदी सुरू केल्यानंतर मजुरांचा हा प्रश्न सुटणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
मोहफूल वेचणाऱ्यांचा खासदारांना घेराव
By admin | Updated: April 13, 2016 01:36 IST