गडचिरोली : जिल्ह्यातील महिलांना रोजगार मिळावा यासाठी वनविभागाने पाचही विभागात सुमारे २७ प्रकल्प सुरू केले असून या प्रकल्पाच्या माध्यमातून ६६० महिलांना रोजगार प्राप्त झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकही मोठा उद्योग नसल्याने जिल्ह्यातील नागरिकांना शेतीशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहिला नाही. जलसिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने पेरलेले पीकही हाती येईल याची शाश्वती नाही. तरीही नाईलाजास्तव बहुसंख्य नागरिकांना शेतीच करावी लागत आहे. तरूण युवकांना रोजगारासाठी बाहेर जिल्ह्याची कास धरावी लागत आहे. तरूण व पुरूषवर्गालाच रोजगार मिळत नसताना महिलांना रोजगार मिळणे हे एक दिवास्वप्नच वाटत होते. अशा परिस्थितीत वनविभागाने अगरबत्ती प्रकल्प सुरू करून शेकडो महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आलापल्ली वनविभागातील मुंतापूर, चामोर्शी, घोट, पेरमिली, ईतलचेरू या पाच ठिकाणी १५३ मशिन आहेत. यामधून १६० महिलांना रोजगार मिळाला आहे. वडसा वनविभागांतर्गत पोर्ला, मरेगाव, सोनसरी, वडेगाव, गोठणगाव या पाच ठिकाणी १३० मशिन असून तेवढ्याच महिलांना रोजगार मिळाला आहे. गडचिरोली वनविभागातील वाकडी, देऊळगाव, मारोडा, मुरूमगाव, लेखा अशा पाच ठिकाणी १०५ मशिन आहेत. यामधून सुमारे १२५ महिलांना रोजगार मिळाला आहे. भामरागड तालुक्यातील भामरागड, लाहेरी, गट्टा, ताडगाव, जारावंडी या पाच ठिकाणी १०० मशिन आहेत. तेवढ्याच महिलांना रोजगार मिळाला आहे. सिरोंचा तालुक्यातील सिरोंचा, रोमपल्ली, झिंगानूर, कमलापूर, जिमलगट्टा, असरअल्ली, कोपेला या सात ठिकाणी १४५ मशिनवर सुमारे १४५ महिला काम करीत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात एकुण २७ केंद्र आहेत. त्यामध्ये ६३३ मशिन असून ६६० महिलांना रोजगार मिळाला आहे. कुरखेडा येथे अगरबत्तीच्या गोल काड्या बनविण्याचा प्रकल्प आहे. अगरबत्तीसाठी लागणारा कच्चा माल अगरबत्तीकेंद्रापर्यंत पोहोचविण्यात येते. कच्चा मालापासून महिला मशिनच्या सहाय्याने अगरबत्ती बनवितात. प्रतिकिलो २५ रूपये एवढी मजूरी सदर महिलेला दिली जाते. एक महिला दिवसाकाठी ८ ते १० किलो अगरबत्ती बनविते. म्हणजेच जवळपास दिवसाची २५० रूपये मजूरी मिळते. गावातच अगरबत्ती प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगार मिळत असल्याने दिवसेंदिवस अगरबत्ती बनविण्यासाठी इच्छुक महिलांची संख्या वाढत असल्याचे दिसून येते. त्यामुळे इतरही ठिकाणी अगरबत्ती प्रकल्प सुरू करण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अगरबत्ती प्रकल्पाबरोबरच संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या सदस्यांना गॅसचे वाटप, ज्या नागरिकांच्या वीज नाही अशा नागरिकांना सौर लाईटचे वाटप आदी उपक्रम वनविभाग राबवित आहे. (नगर प्रतिनिधी)
६६० महिलांना रोजगार
By admin | Updated: August 9, 2014 01:13 IST