लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : हवामान विभागाच्या अंदाजाला चकमा देत यंदा मान्सूनचे आगमन पंधरा दिवस लवकर झाले. यामुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांनी लवकर सुरू केला. चांगल्या पाऊसपाण्यामुळे पिकेसुद्धा जोमात वाढत असतानाच निसर्गाची वक्रदृष्टी झाली. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे ९ हजार ७७२.०४ हेक्टर तर ऑगस्ट महिन्यात १ हजार ८६७.७१ हेक्टर अशा एकूण ११ हजार ६३९.७५ हेक्टर शेतीला फटका बसला. यातील बहुतांश पिके नष्ट झाली. याचे पंचनामे करण्यात आलेले आहेत.
जिल्ह्यात धान, कापूस, सोयाबीन, तूर, तीळ, मका यासह विविध पिकांची लागवड खरीप हंगामात केली जाते. यंदा सर्वाधिक क्षेत्रावर धान पिकाची पेरणी व लागवड करण्यात आलेली आहे. त्यानंतर कापूस पिकाचा क्रमांक लागतो. जिल्ह्यात बारमाही वाहणाऱ्या नद्या असल्याने याच नदी परिसरातील धान व कापूस पिकाला जुलै व ऑगस्ट महिन्यात आलेल्या अतिवृष्टी व पुरामुळे जोरदार फटका बसला. १९१३२८.०१ हेक्टर क्षेत्रावर यावर्षी धान पिकाची तर १६ हजारवर हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली आहे.
आरमोरी तालुक्यात पुरामुळे सर्वाधिक नुकसान
जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आरमोरी तालुक्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला. तालुक्यातील ५०३१.३५ हेक्टर क्षेत्रावरील पिके जुलै महिन्यात बाधित झाली तर ऑगस्ट महिन्यात ३० हेक्टर क्षेत्रावरील पिकांना पुराचा फटका बसला. ५ हजार ६१.३५ हेक्टर आर. क्षेत्रावरील पिके यंदा बाधित झाली.
जिल्ह्यातील १८ हजार ९१९ शेतकऱ्यांचे झाले नुकसान
जुलै व ऑगस्ट महिन्यातील पुरामुळे जिल्ह्यातील एकूण १८ हजार ९१९ शेतकरी बाधित झाले. जुलै महिन्यात १६ हजार ४७९ तर ऑगस्ट महिन्यात २ हजार ४४० शेतकऱ्यांचे धान व कापूस पीक बुडाले व खडून गेले.
नुकसानीचा अहवाल (हेक्टर)तालुका जुलै ऑगस्टगडचिरोली १४८४.७८ ४३२.३९धानोरा १७०.९६ ५४.९५चामोर्शी १५७४.७० ८०मुलचेरा १३.७० ०.२देसाईगंज २१३.०५ ००आरमोरी ५०३१.३५ ३०कुरखेडा २५७.६७ २४.४कोरची २७२.५९ ००अहेरी ४०३.५६ २१२.२३एटापल्ली ०० १४.२सिरोंचा ३४९.६८ १३०.३४भामरागड ०० ९८०एकूण ९७७२.०४ १८६७.७१