भीमपूर येथील घटना : टॉवर लाईनच्या तारा तुटल्या कोरची : चंद्रपूर जिल्ह्यातून छत्तीसगडमधील भिलाईपर्यंत गेलेल्या ४०० केव्ही टॉवर लाईनच्या जीवंत तारांचा स्पर्श झाल्याने तीन बैल जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास तालुक्यातील भीमपूर येथे घडली. भिलाईकडे जाणारी ३१७ क्रमांकाची टॉवर लाईन भीमपूर येथून टाकण्यात आली असून, या लाईनवर ७६५ केव्हीचा व्होल्टेज आहे. या टॉवरलाईनद्वारे भिलाईवरुन वर्धा जिल्ह्याला वीजपुरवठा केला जातो. भीमपूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या मागे अवघ्या ३०० मीटर अंतरावर पटाची दाण आहे. त्यावरुनच ही टॉवर लाईन गेली आहे. बुधवारी दुपारी काही बैल चरत असताना तुटलेल्या वीज तारांचा स्पर्श झाल्याने दोन बैल जागीच ठार झाले. काही वेळानंतर एक बैल जंगलातून परत येत असताना तारांचा स्पर्श होऊन तोही मृत्युमुखी पडला. घटनेची माहिती मिळताच ब्रम्हपुरी येथील पॉवर ग्रीडचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बैल मालकांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. सध्या तेंदू हंगामापूर्वी खूटकटाईचे काम सुरु आहे. नागरिक या कामासाठी जंगलात जातात. परंतु बुधवारी नागरिक दुसऱ्या मार्गाने जंगलात गेले होते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मंगळवारी रात्री कोरची तालुक्यात वादळासह सुमारे ६५ मिमी पाऊस झाला. त्यामुळे वीज तारा तुटल्या असाव्यात, असा अंदाज आहे. अवकाळी पावसामुळे कोरची तालुक्यात आंबा, चना, तूर, गहू इत्यादी पिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच विटाभट्टी मालकांनाही मोठा फटका बसला आहे. (प्रतिनिधी)
वीज तारांच्या स्पर्शाने तीन बैल ठार
By admin | Updated: March 9, 2017 01:32 IST