लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : थकीत वीज बिलाची वसुली करण्यासाठी महावितरणकडून कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे. मार्च महिन्यात वीज बिल न भरणाऱ्या जवळपास २०० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तर दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडे एक कोटी रुपयांची थकबाकी असताना देखील या कार्यालयांवर कारवाई होताना दिसून येत नाही.
शासकीय कार्यालयांतील अनेक सेवा या इमर्जन्सी असल्याने त्यावर कारवाई करताना बंधने येत असल्याचे सांगण्यात येत आहे; परंतु संबंधित कार्यालयांना बिल भरण्यासाठी वारंवार नोटीस महावितरणकडून पाठविण्यात येते. तरीही वीज बिल भरले जात नाही. मार्च महिना असल्याने महावितरणकडून थकबाकी वसुली मोहीम जोरात राबविण्यात आली.
मार्चमध्ये महावितरण अलर्टमार्च महिन्यात महावितरणकडून थकीत विजबिलाच्या वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. ज्या ग्राहकांकडून बिल भरण्यास सहकार्य मिळाले नाही त्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
एप्रिल महिन्यातही चालणार मोहीमथकबाकी वाढली की महावितरणचा डोलारा ढासळायला लागते. त्यामुळे जास्तीत जास्त वसुली होईल, याकडे लक्ष दिले जाते. एप्रिल महिन्यातही वसुली मोहीम चालू राहणार आहे.
शासकीय कार्यालयांकडे एक कोटीची थकबाकीशहरातील शासकीय कार्यालये, रुग्णालये, शाळा तसेच स्ट्रीट लाइट याकडे जवळपास एक कोटी रुपयांचे वीज बिल थकीत असल्याची माहिती महावितरण कार्यालयाकडून मिळाली आहे.
कार्यालयाची वीज का नाही तोडली ?
- शासकीय कार्यालयांतील अनेक सेवा या इमर्जन्सी असल्याने त्यावर कारवाई करताना बंधने येत असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. परंतु, संबंधित कार्यालयांना वीज बिल भरण्यासाठी नोटीस बजाविण्यात येतात.
- काही थकबाकी रूग्णालयांकडेसुद्धा आहे. मात्र रूग्णालयाची वीज कपात करणे महावितरणला शक्य होत नाही. अशावेळी थकबाकीचा आकडा वाढत गेलेला दिसून येते.
"विजेचा वापर केल्यावर महावितरण बिल पाठविते. बिल मिळाल्यापासून ते भरण्याची मुदत जवळपास दहा दिवस असते. या कालावधीत प्रत्येकाने बिल भरणे गरजेचे आहे."- पुंजिराम म्हशाखेत्री, नागरिक.
"महावितरणकडून ज्याप्रकारे थकीत वीज बिलाची वसुली केली जाते, त्याच प्रकारची सेवादेखील देणे अपेक्षित आहे. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना वाढतात."- राकेश चौधरी, नागरिक