आरमोरी : तालुक्यातील ग्रामपंचायतीची निवडणूक ३० एप्रिल रोजी होणार असून त्यासाठी निवडणूक प्रशासनाने तालुक्यातील सुमारे ६५० कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे प्रशिक्षण दिले. आरमोरी तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतीची निवडणूक घेतली जाणार आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने पार पडावी. त्याचबरोबर वेळेवर कोणताही गोंधळ उडू नये यासाठी ज्या कर्मचाऱ्यांची निवडणुकीच्या कामासाठी नेमणूक झाली आहे. अशा सुमारे ६५० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणाला तहसीलदार दिलीप फुलसंगे, नायब तहसीलदार व्ही. टी. फुलबांधे, जी. एस. बन्सोड, एस. व्ही. चन्नावार, डॉ. रवींद्र होळी उपस्थित होते. प्रशिक्षणार्थ्यांना तलाठी डी. एल. कुबडे व जी. एम. कुमरे यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणादरम्यान निवडणूक कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीन कशा पध्दतीने हाताळावी, याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आली. त्याचबरोबर मतदानासाठी वापरण्यात येणारी कागदपत्रे कशी भरावी, याबद्दलची माहिती देण्यात आली. प्रशिक्षणाला संपूर्ण कर्मचारी उपस्थित होते. प्रशिक्षणादरम्यान ईव्हीएम मशीन व कागदपत्रांबद्दल निर्माण झालेल्या शंकांचे निरसनही मार्गदर्शकांनी केले. आरमोरी तालुक्यातील निवडणुका ३० एप्रिल रोजी होणार आहेत. सकाळी ७ वाजेपासूनच मतदानाला सुरूवात होते. त्यामुळे पोलिंग पार्ट्या आदल्या दिवशीच मतदानाच्या ठिकाणी जाऊन राहतात. आरमोरी तालुक्यातही काही गावे दुर्गम भागात आहेत. त्यामुळे सर्व पोलिंग पार्ट्या चोख पोलीस बंदोबस्तात पाठविल्या जाणार आहेत. वेळेवर कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी सर्व निवडणूक कर्मचाऱ्यांना २८ एप्रिल रोजीच बोलाविण्यात आले आहे. सायंकाळपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे सामान घेऊन बुथवर रवाना केले जाणार आहे. २८ ते ३१ पर्यंत कर्मचारी याच कामात गुंतले राहणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)
६५० कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे प्रशिक्षण
By admin | Updated: April 26, 2015 02:00 IST