देसाईगंज शहरात आरोग्य सुविधा पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध नसल्याने लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी या ठिकाणीच सर्वच आरोग्यविषयक कामासाठी जावे लागते. तालुक्यातील ही निकड लक्षात घेऊन स्थानिक पदाधिकारी, आमदार यांचे शासनाकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्याने ग्रामीण रुग्णालय देसाईगंज या ठिकाणी ईसीजी, सोनोग्राफी, एक्स रे मशीन यासारख्या सुविधा पुरविण्यात आल्या. जेणेकरून तालुक्यातील, तसेच इतरही ठिकाणच्या नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा या कमी खर्चात उपलब्ध होऊन दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन उपचार करून घेणे व सर्वसामान्यांना आर्थिक भुर्दंड पडू नये, हा दृष्टिकोन ठेवून या यंत्राची उपलब्धता येथील ग्रामीण रुग्णालयात करून देण्यात आली; परंतु आजमितीस सोनोग्राफी, ई.सी.जी मशीन हाताळण्यासाठी लागणारे अर्हताधारक तंत्रज्ञ उपलब्ध नसल्याने या मशीन धूळ खात पडलेल्या आहेत. येथील सोनोग्राफी मशीन हाताळण्यासाठी खाजगी सोनोग्राफी चालविणाऱ्या डॉक्टरांना पाचारण करून आठवड्यातील एक वा दोन दिवस काहीच वेळ देऊन सोनोग्राफीचे काम उरकले जात आहे. ईसीजी, सोनोग्राफी, एक्सरे मशीन हाताळण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात पूर्णवेळ वरील यंत्रसामग्री हाताळण्यासाठी लागणारे अर्हताधारक टेक्निशियन वा डॉक्टर यांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. देसाईगंज तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालयात तपासणी करण्यासाठी रेफर टू ग्रामीण रुग्णालयाची पावती संबंधित रुग्णांना देतात. मात्र, रुग्ण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता सदर यंत्रे बंद अवस्थेत असल्याचे सांगण्यात येत असल्याने रुग्णांना आरोग्य तपासणीसाठी खाजगी रुग्णालयाकडे धाव घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. ईसीजीचे तीनशे रुपये, तर सोनोग्राफीसाठी सहाशे रुपये घेतले जातात. अल्प दरात रुग्णांना तात्काळ सेवा मिळण्याऐवजी नाहकचा आर्थिक भुर्दंड बसत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आराेग्य विभागाने रुग्णांची होत असलेली गैरसोय लक्षात घेता सदर यंत्रे चोवीस तास रुग्णांच्या सेवेत उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
बाॅक्स
वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू
यासंदर्भात देसाईगंज ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. मिसार यांना विचारणा केली असता ईसीजी मशीनसंदर्भात वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्यात आला असून, लवकरच नवीन मशीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सोनोग्राफीसंदर्भात शासनाच्या नियमानुसार गरीब लोकांसाठी माता व बालसंगोपन उपक्रमांतर्गत वापर करण्यात येत असून, सदर मशीनचा संबंधित इतरही तपासणीकरिता उपयोग करता यावा, करिता तपासणीची परवानगी मिळण्यासंदर्भातही वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.