शिक्षक गोंधळले : शिक्षकवर्ग पुन्हा माहिती भरण्यात व्यस्तगडचिरोली : मागील सहा महिन्यांपासून शिक्षकवर्ग सरलमध्ये माहिती भरण्यास व्यस्त आहेत. मात्र हे काम अजूनपर्यंत पूर्ण झाले नाही. परिणामी हीच माहिती आता शासनाने यू-डायसच्या माध्यमातून १ जानेवारीच्यापूर्वी मागितली असल्याने शिक्षकवर्ग मागील ४ दिवसांपासून सदर माहिती भरण्याच्या कामात व्यस्त झाले आहेत. राज्यभरातील सर्व शाळा, शिक्षक, विद्यार्थी यांची प्रत्येक माहिती शासनाला एका क्लिकवर कधीही मिळविता यावी, यासाठी शिक्षण विभागाने सरल नावाचे सॉप्टवेअर तयार केले होते. या सॉप्टवेअरमध्ये शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीपासूनच माहिती भरण्यात येत आहे. मात्र सॉप्टवेअरमध्ये निर्माण झालेले बिघाड, काही विद्यार्थ्यांची अपुरी माहिती, इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे पहिला सत्र संपून दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली आहे. मात्र ही माहिती अजूनपर्यंत पूर्णपणे भरण्यात आली नाही. परिणामी वर्षाच्या सुरुवातीला शिक्षण विभागाला जी माहिती आवश्यक होती, ती माहिती उपलब्ध झाली नाही. त्यामुळे आता हीच माहिती आता यू-डायसच्या माध्यमातून गोळा करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने शिक्षणाधिकारी यांना दिले आहेत. शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्वच शाळांना पत्र पाठविले असून सदर माहिती कोणत्याही परिस्थित १ जानेवारी २०१६ पूर्वी शासनास सादर करायची असल्याने तत्पूर्वी ती शिक्षण विभागाला सादर करावी. माहिती सादर करताना पुरविण्यात आलेल्या प्रपत्रातील खडानखडा माहिती योग्यरित्या भरावी, प्रत्येक शिक्षकाने आपली माहिती अचूक भरली गेली किंवा नाही, याची शहानिशा करावी, सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान व राज्य शासनाच्या इतर योजनांसाठी सदर माहिती उपयुक्त असल्याने चुकीची माहिती भरली गेल्यास शाळा, विद्यार्थी व शिक्षकांच्या उपक्रमाचे नुकसान होऊन शिक्षणावर दुरगामी परिणाम होण्याची भीती शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे. (नगर प्रतिनिधी)
सरलनंतर यू-डायसचा ससेमिरा
By admin | Updated: December 25, 2015 02:07 IST