कुलगुरूंना निवेदन : मागण्यांसंदर्भात केली चर्चागडचिरोली : विद्यापीठ व महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या विविध समस्यांबाबत शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने २४ नोव्हेंबर रोजी गोंडवाना विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. त्यानंतर कुलगुरूंना निवेदन देऊन समस्यांबाबत चर्चा केली व निवेदन दिले.विविध उच्च न्यायालय तथा सर्वोच्च न्यायालयाने प्राध्यापकांच्या बाजुने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करून नेटसेट मुक्त प्राध्यापकांची त्यांच्या सेवेच्या पहिल्या दिवसापासून सेवाग्राह्य धरून पदोन्नतीचे लाभ द्यावे, पाचव्या वेतन आयोगानुसार निवड श्रेणीनंतर पाच वर्ष सेवा झालेल्या प्राध्यापकांना १४ हजार ९४० या वेतन श्रेणीचा लाभ द्यावा, राखून ठेवलेल्या वेतनवाढीची परतफेड करावी, ग्रॅज्यूएटीच्या फरकारची अंमलबजावणी करावी, आयुर्वेद महाविद्यालयातील प्राध्यापकांना सेवानिवृत्ती व ग्रॅज्युएटीचा लाभ द्यावा, परीक्षा कामावर बहिष्कार काळातील प्राध्यापकांचे ७१ दिवसांचे वेतन द्यावे, समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापकांना न मिळालेल्या सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्यात यावी, आदी मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. एस. बी. रेवतकर, सचिव प्रा. डॉ. एच. बी. धोटे, प्रा. दुधपचारे, प्रा. खेराणी, प्रा. डॉ. देशमुख, प्रा. कोसे यांच्यासह जिल्ह्यातील बहुसंख्य प्राध्यापक सहभागी झाले होते. आंदोलनानंतर गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू किर्तीवर्धन दीक्षित व कुलसचिव डॉ. विनायक इरपाते यांच्यासोबत मागण्यासंदर्भात चर्चा करून त्यांना निवेदन सादर केले. समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. (नगर प्रतिनिधी)
प्राध्यापकांचे धरणे आंदोलन
By admin | Updated: November 24, 2014 22:57 IST