कुरखेडा : जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामात यांत्रिकीकरणाचा वापर करीत असल्याने शेतकऱ्यांच्या वेळ, श्रम, पैशात बचत होत आहे. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांचे उत्पादन वाढत आहे. तालुक्यात बहुतांश ठिकाणी मागील खरीप हंगामात धानाची रोवणी करतांना यंत्रांचा वापर करण्यात आला. यात शेतकऱ्यांना अधिक लाभ झाला आहे. अनेक शेतकऱ्यांचे धानाचे उत्पन्न दीड पटीने वाढले आहे. पंचायत समिती कृषी विभागाच्या सहकार्याने तालुक्यातील लेंढारी येथील नरेंद्र मातेरे हे शेतकरी मागील खरीप हंगामापासून यांत्रिकी पद्धतीने धानाची रोवणी करीत आहेत. त्यामुळे या पद्धतीचा त्यांना मोठा फायदा झाला आहे. उत्पन्नात वाढ झाली असून मजूर व इतर संसाधनात बचत झाली आहे. धानाची शेती करतांना ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीचा वापर केल्या जातो. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे श्रम, वेळ, पैसा वाया जात असतो. मात्र त्या तुलनेत उत्पादनात वाढ होत नाही. एकुण उत्पादनापेक्षा खर्च अधिक राहतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाचा वापर करावा, असे आवाहन पं. स. कृषी अधिकारी डफ यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)
यांत्रिकीकरणामुळे दीडपट उत्पन्न वाढ
By admin | Updated: March 2, 2015 01:24 IST