आनंद मांडवे - सिरोंचाशेतकर्यांना जलसिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाने सिरोंचा तालुक्यात ४0 विहिरी बांधण्याला मंजुरी दिली असली तरी चार महिन्याचा कालावधी लोटूनही निधी प्राप्त झाला नसल्याने सदर विहिरींचे बांधकाम अपूर्ण आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे ७८ टक्के जमीन जंगलांनी व्यापली आहे. या जमिनीवर मोठे सिंचन प्रकल्प बांधण्यास शासन परवानगी देत नाही. एवढेच नाही तर तलाव निर्मितीमध्येही पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होत असल्याने तलावांचे बांधकामही करून दिले जात नाही. त्याऐवजी शेतकर्यांना विहीर बांधून देण्यासाठी शासन प्राधान्य देत आहे. जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेंतर्गत सिरोंचा तालुक्यात ४0 विहिरींच्या बांधकामाला चार महिन्यापूर्वी मंजुरी दिली. ज्या लाभार्थ्यांनी विहिरीसाठी अर्ज केला होता. अशा लाभार्थ्यांच्या शेत जमिनीमध्ये पाणी आहे किंवा नाही याची शहनिशा करण्याचे निर्देश सिंचाई विभागाने भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेला दिले. भूजल यंत्रणेने या बाबीची तपासणी करून सदर शेतकर्यांच्या जमिनीत पाणी असल्याबाबतचे प्रमाणपत्र ७ डिसेंबर २0१३ रोजी जिल्हा परिषदेच्या सिंचाई विभागाला सादर केले आहे. याच पत्राची एक प्रत सिरोंचा तहसीलदारांना पाठविण्यात आली आहे. तहसील कार्यालयाने सदर पत्र २४ फेब्रुवारी रोजी सिरोंचा येथील सिंचाई शाखेच्या शाखा अभियंत्यास अग्रेषित केले आहे. सदर पत्रात अविलंब अंदाजपत्रके तयार करून प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेसाठी तहसील कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मात्र चार महिन्याचा कालावधी लोटूनही यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. येत्या काही दिवसातच पावसाळ्याला सुरूवात होणार आहे. पावसाळ्यामध्ये विहीर बांधणारे मजूर मिळत नाही. शेतात पीक राहत असल्याने विहिरीचे खोदकाम करणेसुद्धा अशक्य आहे. उन्हाळ्याच्या दिवसात शेतीची कामे राहात नसल्याने सिरोंचा तालुक्यातील बहुतांश मजूर दुसर्या तालुक्यात किंवा सीमावर्तीय आंध्र प्रदेशात रोजगारासाठी स्थलांतरित होतात. ४0 विहिरींच्या बांधकामाला सुरूवात झाली असती तर उन्हाळ्यामध्ये बहुसंख्य मजुरांना रोजगार मिळाला असता. या रोजगारापासून मजुरांना वंचित राहावे लागले आहे. विहिरींचे बांधकाम झाले असते तर सदर शेतकर्यांना खरीप हंगामात सिंचनाची सुविधा निर्माण झाली असती. पुढील उन्हाळ्यात दुबार पीक घेण्यासाठीही मदत झाली असती. मात्र प्रशासनाच्या दिरंगाईमुळे या सर्व फायद्यांपासून वंचित राहावे लागले आहे. सिंचाई विभागाने सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर, गोल्लागुडम, वेन्नलाया, गुम्मलकोंडा, चिंतरेवूला, अंकिसा चक, आरडा, आदिमुत्तापूर, अमरादी, नारायणपूर, तमंदाला, राजेश्वरपल्ली चक, राजन्नापल्ली, लक्ष्मीदेवी पेठा, चिपूरदुब्बा व ब्राह्मणपल्ली या गावांमध्ये विहिरी मंजूर केल्या आहेत. यातील अनेक गावे दुर्गम क्षेत्रात मोडतात. विहिरींचे बांधकाम झाले असते तर शेतकर्यांना दुबार पीक घेता आले असते. त्यामुळे उत्पन्न वाढण्यास मदत झाली असती. सदर विहिरींच्या अंदाजपत्रकास मंजुरी देऊन तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.
निधीअभावी विहिरी रखडल्या
By admin | Updated: May 31, 2014 23:29 IST