गडचिरोली : गेल्या चार-पाच दिवसांपासून संततधार पाऊस कायमच आहे. आरमोरी तालुक्यात गेल्या २४ तासात ६४ मिमी पाऊस झाला आहे. दमदार पावसामुळे आरमोरी तालुक्यातील वैलोचना नदीला पूर आला आहे. यामुळे वैरागड-मानापूर मार्ग मंगळवारी सकाळपासूनच बंद झाला आहे. कुरखेडा तालुक्यातील कढोलीनजीकच्या सती नदीला पूर आल्यामुळे मंगळवारी दुपारी २ वाजतापासून वैरागड-कुरखेडा मार्ग बंद झाला आहे. हा मार्ग बंद झाल्यामुळे परिसरातील नागरिकांना मार्गक्रमण करण्यासाठी अडचण जात आहे. परिणामी कुरखेडा व आरमोरी तालुक्याच्या ठिकाणी आवागमन करणे बंद झाले आहे. कुरखेडा व आरमोरी तालुक्यात दमदार पाऊस असल्यामुळे या दोनही तालुक्यातील लहान नाल्यांनाही पूर आला आहे. जिल्ह्यात इतर तालुक्यातही अनेक दुर्गम गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला असून गेल्या २४ तासात जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस कोरची तालुक्यात १७७.६ मिमी झालेला आहे. या पावसामुळे नदीकाठावरील शेतांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. विसोरा भागात अनेक शेतातील पऱ्हे वाहून जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. गडचिरोली शहरातही गेल्या २४ तासापासून संततधार पाऊस सुरू असल्याने जनजीवनावर परिणाम झाला आहे. शहरात अनेक सखल भागात पाणी साचले आहे. नाल्याचा पावसाळ्यापूर्वी उपसा न झाल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर जमा होत आहे. शनिवारच्या सकाळपासून अजूनही सुरु असलेल्या सततच्या पावसाने गाढवी नदीतील पाण्याची पातळी वाढली असून पाऊस असाच येत राहिल्यास रात्रभरातून नदीला पूर येण्याची शक्यता आहे. पुष्य नक्षत्राला प्रारंभ होताच सुरु झालेली पावसाची झळ आज चौथ्या दिवशीही कायम असल्याने गाढवी नदी झपाट्याने फुगली त्यामुळे नदी किनाऱ्याच्या लगत असलेल्या शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत.
पुरामुळे वैरागड-मानापूर, वैरागड-कुरखेडा मार्ग बंद
By admin | Updated: July 23, 2014 00:00 IST