चामोर्शी/वैरागड : मागील वर्षीच्या पावसाळ्यात गडचिरोली जिल्ह्यात सरासरी ६० ते ७० टक्केच पाऊस झाला. याचा परिणाम मार्च महिन्यापासूनच दिसायला लागला आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी सरासरीच्या जवळपास एक मीटरने पहिल्यांदाच खोल गेली आहे. त्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातही पाणी टंचाई निर्माण झाली आहे. मात्र पाणी पुरवठा योजनांच्या व्हॉल्वमधून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. यामुळे पाणी टंचाईची समस्या गंभीर होणार आहे.गडचिरोली जिल्ह्यात राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पावसाचे प्रमाण अधिक आहे व पाण्याचा उपसा मात्र कमी आहे. त्यामुळे भूजल पातळी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात मे व जून या महिन्यातच पाणी टंचाईच्या झळा सुरू होतात. मात्र यावर्षी एप्रिल महिन्यापासूनच पाणी टंचाईची समस्या गंभीर झाली आहे. काही गावांना पाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा केला जातो. पाईपलाईनला धोका होऊ नये, यासाठी नदी ते पाण्याची टाकी यांच्यादरम्यान व्हॉल्व बसविण्यात येतात. मात्र हे व्हॉल्व फिट बसत नसल्याने यामधून पाण्याचा अपव्यय होतो. जिल्हाभरात अशा प्रकारचे शेकडो व्हॉल्व दिसून येतात. (लोकमत न्यूज नेटवर्क)वैरागडात पाण्याचा अपव्यय४वैरागड गावाला पाणी पुरवठा करणारी जुनीच योजना आहे. वाढलेली लोकसंख्या लक्षात घेऊन या गावासाठी नवीन पाणी पुरवठा योजना तयार करण्याचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला. मात्र अजुनपर्यंत याला मान्यता मिळाली नाही. कमी पाण्यामुळे गावात पाणी टंचाई आहे. मात्र नदी ते पाण्याची टाकी यादरम्यानच्या व्हॉल्वमधून पाण्याचा अपव्यय होत आहे. याकडे ग्रामपंचायतीने लक्ष देणे गरजेचे आहे.गौरीपूर ग्रा.पं.चे दुर्लक्ष४चामोर्शी तालुक्यातील गौरीपूर ग्रामपंचायतीला राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत नळ योजना बांधून देण्यात आली आहे. पाणी पुरवठा करणारी टाकी वालसरा गावाजवळील नाल्यावर बांधण्यात आली आहे. या नाल्यापासून भिवापूर मुख्य रस्त्यालगत पाईपलाईनवरील व्हॉल्व लिकेज आहे. दिवसभरातून हजारो लिटर पाणी या व्हॉल्वमधून रात्रंदिवस गळत राहते. या पाण्याचा उपयोग भिवापूर येथील नागरिक करीत आहेत. या लिकेजमुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. याकडे गौरीपूर ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. गावात मात्र कमी पाणी पुरवठा होत असल्याने महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याचे चित्र दिसून येते.
दुष्काळातही व्हॉल्वमधून पाण्याचा अपव्यय सुरूच
By admin | Updated: April 18, 2016 03:57 IST