गडचिरोली : गडचिरोली येथील औद्योगिक वसाहतीत पोलीस दलाला हेलिपॅडसाठी जागा पुरविण्यात आली आहे. येथे हेलिपॅडची निर्मिती होणार असल्याने गडचिरोली जिल्हा मुख्यालयात होणाऱ्या हवाईपट्टीचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. २००९ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात नक्षली हल्ल्यात ५० वर अधिक पोलीस जवान शहीद झाले होते. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण स्वत: गडचिरोलीत मानवंदना कार्यक्रमासाठी आले होते. येथून मुंबईला गेल्यानंतर गडचिरोली येथे हवाईपट्टी निर्माण केली जाईल, असे जाहीर केले होते. त्यानंतर राज्य शासनाकडून तत्परतेने हालचाली सुरू झाल्या होत्या. बोदली मार्गावर हवाईपट्टीसाठी जागा पाहण्यात आली. परंतु या परिसरातील शेतकऱ्यांनी जागा देण्यास विरोध केल्यावर वाकडी परिसरात जागेची पाहणी करण्यात आली. ही जागा वन विभागाची असल्याने या जागेची रक्कम राज्य सरकारला वन विभागाकडे भरायची होती. त्यामुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला.पोलीस दलाला हवाईपट्टी देण्याकरिता जागेचा शोध सुरू असताना तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी गडचिरोली एमआयडीसीतील ९० एकर जागा पोलीस विभागाला देण्याचा निर्णय घेतला. यासाठी सुरक्षेचे कारण देण्यात आले. आता येथे हवाईपट्टी तयार केली जाणार आहे. त्यामुळे वाकडी मार्गावर हेलिपॅड करण्याची गरज राहणार नाही, त्यामुळे हेलिपॅडचा प्रश्न मार्गी लागल्यात जमा आहे.
एमआयडीसीत जागा दिल्याने हवाईपट्टीचा प्रश्न निकाली
By admin | Updated: November 11, 2015 00:46 IST