लाहेरी : प्रशासनाच्या वतीने पाणी टंचाई निवारणार्थ ठोस उपाय योजना करण्यात न आल्याने भामरागड तालुक्याच्या लाहेरी या अतिदुर्गम भागात गेल्या अनेक दिवसांपासून पाणी टंचाईची समस्या तीव्र झाली आहे. मात्र याकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.लाहेरी येथील दोन हातपंप गेल्या १५ दिवसांपासून नादुरूस्त स्थितीत आहे. या संदर्भात लाहेरीचे सरपंच सुरेश सिडाम व ग्रामसेवक कुंटावार यांनी भामरागड पंचायत समितीकडे लेखी तक्रार दिली. मात्र अद्यापही नादुरूस्त हातपंपाची दुरूस्ती करण्यात आली नाही. लाहेरी परिसरात असलेल्या बंगाडी या गावात प्रचंड पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गावातील स्त्रोतांना पाणी नाही. त्यामुळे या गावातील नागरिक व महिलांना गावाजवळच्या नाल्याचे पाणी आणावे लागत आहे. नाल्याच्या पाण्यावर बंगाडीवासीयांना तहान भागवावी लागत आहे. पावसाळ्यात बंगाडी गावालगतच्या नाल्याला पूर येतो त्यावेळी गावातील स्त्रोतांना गढूळ पाणी येते. परिणामी गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते, असे सरपंच सिडाम यांनी म्हटले आहे.
लाहेरी भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य
By admin | Updated: April 26, 2015 01:57 IST