लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मनुष्याचे जीवनमान झपाट्याने बदलत आहे. यामध्ये तग धरण्यासाठी गांधींनी सांगितलेली ‘आरोग्य स्वराज’ ही संकल्पना नव्याने समजून घेणे आवश्यक आहे. विचारांची शिकवण देणारे गांधी आणि या विचारकृतीला सामावून घेणारी गडचिरोलीची माणसे ही माझ्यासाठी दोन विद्यापीठे आहेत. त्यामुळे हा पुरस्कार गडचिरोलीच्या लोकांना समर्पित आहे, अशी भावना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.अभय बंग यांनी व्यक्त केली.पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या ५० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.राणी आणि डॉ.अभय बंग या दाम्पत्याला २८ फेब्रुवारीला लोकसेवेसाठी ‘जेआरडी टाटा अवॉर्ड’ ने सन्मानित करण्यात आले. प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समुहाचे अध्यक्ष रतन टाटा यांच्या हस्ते व भावना पॉप्युलेशन फाउंडेशनच्या कार्यकारी संचालक पूनम मुट्रेजा यांच्या उपस्थितीत त्यांना सन्मानचिन्ह देण्यात आले. या सोहळ्यात डॉ.बंग बोलत होते.यावेळी रतन टाटा म्हणाले, देशाच्या प्रगतीसाठी तरुणांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. त्यासाठी युवांची सक्षम पिढी घडली पाहीजे. डॉ.बंग दाम्पत्य आरोग्यासोबतच सामाजिक भान असलेली युवा पिढी तयार करण्याचे काम अनेक वर्षांपासून करीत आहे. त्यामुळे लोकसेवेसाठी प्रथमच दिला जाणारा जेआरडी टाटा सन्मान या दोघांना देताना मला आनंद होत आहे. दिल्लीतील हिंसाचारात जीव गमावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करीत डॉ.राणी बंग म्हणाल्या, गडचिरोलीत नक्षलग्रस्त भागात लोकांना अशाच दु:खाला सामोरे जावे लागते. त्यांचे दु:ख आम्ही आरोग्यसेवेच्या माध्यमातून कमी करण्याचा प्रयत्न करीत असून हा पुरस्कार त्यांना व कार्यकर्त्यांना समर्पित आहे, असे त्या म्हणाल्या.
डॉ. अभय बंग जेआरडी टाटा अवॉर्डने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 19:49 IST
पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या ५० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.राणी आणि डॉ.अभय बंग या दाम्पत्याला २८ फेब्रुवारीला लोकसेवेसाठी ‘जेआरडी टाटा अवॉर्ड’ ने सन्मानित करण्यात आले.
डॉ. अभय बंग जेआरडी टाटा अवॉर्डने सन्मानित
ठळक मुद्देगांधी आणि गडचिरोलीकर माझ्यासाठी दोन विद्यापीठे