आजही होते त्यांच्यात पोटमागणी : पैसा नसल्याने अनेक राहतात अविवाहितनरेश रहिले - गोंदियासमाजात मुलींचे प्रमाण भ्रुणहत्येमुळे कमी होत असले तरी मुलांकडील मंडळी मुलीच्या वडीलांकडून हुंडा घेतात. परंतु मेंढपाळ यांच्या समाजातील हुंड्यासंबधी प्रथा वेगळीच आहे. ते मुलगी मिळविण्यासाठी मुलीच्या वडीलाला लाखोंच्या घरात हुंडा देतात. याशिवाय त्यांना मुलगी मिळत नसून असा प्रकार आजही सुरू आहे. पोटाची आग विझविण्यासाठी वन-वन भटकणाऱ्या मेंढी पालन करणाऱ्यांना आपला संसार चालविताना अस्मानी संकटाबरोबर मानव निर्मित प्रथांचाही सामना करावा लागत आहे. आपल्या समाजात मुलींच्या वडीलांकडून मुलगा हुंडा मागत असतो. परंतु या मेंढी पालन करणाऱ्या लोकांमध्ये मुलीच्या वडीलांना मुलाकडून हुंडा द्यावा लागतो. हा हुंडा शेकडो किंवा हजारो रुपयांच्या घरात नसतो, तर चक्क ८ लाख ते २० लाखांच्या घरात एका मुलीसाठी हुंडा मुलीच्या बापाला मोजावा लागतो. मुलगी शिकली आहे किंवा नाही याची शहानिशाही ते न करता तिचे वडील किती धनाढ्य आहे, ती किती सुंदर आहे यावर त्या मुलीच्या वडीलाला हुंडा देण्याची रक्कम ठरते. या समाजातील लोक वयाच्या सातव्या, आठव्या वर्षातच मुला-मुलीचे लग्न करतात. परंतु लग्नानंतर मुलगी मुलाघरी जात नाही. ती वयात आल्यानंतरच तिला सासरी पाठविले जाते. मेंढी पालन करून आपला उदरनिर्वाह चालविणाऱ्या या मेंढपाळाच्या नशिबी अठराविश्वे दारिद्रय असल्याने ते आपल्या गरजा पूर्ण करू शकत नाही. मात्र यांच्या समाजात चालणारी हुंड्याची प्रथा जिवघेणी ठरत आहे. त्यासाठी अनेक लोक अदलाबदल करून मुला-मुलींचे लग्न करून घेतात. या समाजातील बहुतांश कुटूंबातील मुला-मुलींचे लग्न अदलाबदलामुळे झाले आहे. आपला पैसा लागू नये यासाठी अनेक लोक पोट मागणीही करीत असल्याची माहिती येथील लोकांनी दिली आहे.
मुलगी मिळविण्यासाठी द्यावा लागतो हुंडा
By admin | Updated: July 5, 2014 23:36 IST