गडचिराेली : जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून काेराेना संसर्गाचा प्रसार झपाट्याने हाेत आहे. बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या आदेशान्वये जिल्ह्यात संचारबंदी लागू केली. काेविडच्या नियमांचे पालन करीत जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकांच्या ५० टक्के उपस्थितीच्या आदेशाची काटेकाेर अंमलबजावणी केली जात आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन जि.प.च्या सर्व शाळा १२ मार्चपासून सकाळपाळीत केल्या आहेत. मात्र, आदिवासी विकास विभागाच्या शासकीय व अनुदानित शाळा या सर्व नियमांना अपवाद ठरल्या आहेत. ५० टक्के उपस्थितीच्या आदेशालाही खाे दिला जात आहे.
काेराेनाबाधित रुग्णांची संख्या जिल्ह्यात वाढत असून, हा प्रादुर्भाव आटाेक्यात आणण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली आहे. जिल्हा परिषदेचा प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग काेविडच्या नियमांचे पालन करून शाळा सकाळपाळीत सुरू आहे. मात्र, आदिवासी विकास विभागांतर्गत गडचिराेली, अहेरी, भामरागड हे तीन प्रकल्प असून, जवळपास ४५ शासकीय आश्रमशाळा आहेत. याशिवाय ५० च्या घरात अनुदानित आश्रमशाळा आहेत.
काेविडच्या वाढत्या प्रभावात व तप्त उन्हामध्ये शासकीय व अनुदानित आश्रमशाळेचे सर्व शिक्षक व कर्मचारी सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५ या वेळेत ठाण मांडून आश्रमशाळेत बसून राहतात. विशेष म्हणजे काेराेना संसर्गामुळे सर्व आश्रमशाळेचे विद्यार्थी आपल्या घरी परतले आहेत. इयत्ता दहावी व बारावीची परीक्षाही पुढे ढकलण्यात आली असून, उर्वरित वर्गाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तरीही आश्रमशाळा विद्यार्थ्यांविना सुरू आहेत. एकही विद्यार्थी नसताना आश्रमशाळेतील शिक्षकांना दुपारपाळीत उपस्थित राहावे लागत असल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
बाॅक्स....
मुख्याध्यापक म्हणतात, आदेश नाही
काेविडच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक शासकीय कार्यालये व शाळांमध्ये कर्मचाऱ्यांची ५० टक्के उपस्थिती ठेवावी, असा आदेश आहे. साेशल डिस्टन्सिंग पाळता यावे, यासाठी हे आदेश आहेत. मात्र, आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांना आदिवासी विकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ५० टक्के उपस्थितीबाबत सूचना नसल्याची बाब पुढे करून मुख्याध्यापक कर्मचाऱ्यांना वेठीस धरत आहेत.