पालकांची मागणी : ७२ विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता एटापल्ली : एटापल्ली व भामरागड तालुक्यातील ७२ आदिवासी विद्यार्थ्यांना वर्धा जिल्ह्याच्या केळझर येथील इंजल्स पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मागील वर्षी दाखल करण्यात आले होते. परंतु यंदा सदर विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील असुविधायुक्त शाळेमध्ये पाठविण्याचे आदेश अप्पर आयुक्त नागपूर यांनी भामरागडच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना दिल्याने या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. सदर विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने या विद्यार्थ्यांना असुविधायुक्त शाळेत पाठवू नये, अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे. २०१५- १६ या शैक्षणिक सत्रात भामरागड प्रकल्प कार्यालयांतर्गत एटापल्ली व भामरागड तालुक्यातील इयत्ता पहिली ते पाचवीमधील ७२ विद्यार्थ्यांना वर्धा जिल्ह्याच्या केळझर येथील इंजल्स पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश देण्यात आला होता. या शाळेत विद्यार्थ्यांनी एक वर्ष शिक्षणही घेतले. परंतु चालू शैक्षणिक सत्रापासून या विद्यार्थ्यांना या शाळेत पाठवू नये, असे आदेश अप्पर आयुक्तांनी भामरागड प्रकल्प अधिकाऱ्यांना दिले. सदर विद्यार्थ्यांना आलापल्ली येथील ग्रीनलँड स्कूलमध्ये पाठवावे, असे आदेश ५ जुलै रोजी देण्यात आले आहेत. या शाळेमध्ये शैक्षणिक सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक महिन्याचा कालावधी उलटूनही पालकांनी विद्यार्थ्यांना आलापल्ली येथील शाळेत पाठविले नाही. सदर विद्यार्थ्यांचा केळझर येथील इंग्लिश स्कूलमध्येच प्रवेश कायम ठेवावा, अशी मागणी १५ दिवसांपूर्वी तहसीलदारांकडे करण्यात आली होती. मात्र अद्यापही निर्णय न झाल्याने ७२ विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे, असा आरोपही पालकांनी केला आहे. (तालुका प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांना असुविधायुक्त शाळेत पाठवू नका
By admin | Updated: August 1, 2016 01:34 IST