गृहराज्यमंत्र्यांचा आशावाद : पदोन्नतीचे फ्लॅग व पुष्पगुच्छ देऊन पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मानगडचिरोली : नक्षलवाद मोडून काढण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने केलेले काम कौतुकास्पद आहे. परिणामी सध्या गडचिरोली जिल्ह्यात नक्षल कारवायांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे लवकरच गडचिरोली जिल्हा नक्षल प्रभावातून मुक्त होईल, असा आशावाद राज्याचे गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले. सहा नक्षलवाद्यांनी मंगळवारी त्यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले . त्यांच्या हस्ते या आत्मसमर्पीत नक्षल सदस्यांना भूखंडाचे कागदपत्र व धनादेश प्रदान करण्यात आले. आता चालू वर्षात आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षल्यांची संख्या ५२ वर पोहोचली आहे. याप्रसंगी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम होते. तसेच विशेष पोलीस महानिरिक्षक रवींद्र कदम, अप्पर पोलीस अधिक्षक मंजुनाथ शिंगे, पोलीस उपअधीक्षक (गृह) गणेश बारस्कर, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले. तर संचालन पोलीस दलाच्या जनसंपर्क अधिकारी उपनिरिक्षक तेजस्वी पाटील यांनी केले. कार्यक्रमाला पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने तथा परिसरातील नागरिक उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)३४ पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नतीजिल्ह्याच्या नक्षलग्रस्त भागात पोलीस दलात उत्तम कामगिरी करणाऱ्यांना वेगवर्धित पदोन्नती देण्याची योजना आहे. या योजनेंतर्गत ३४ पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. यात ११ पोलीस हवालदारांना सहायक फौजदार पदावर तर २३ नाईक पोलीस शिपाई असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस हवालदार पदावर पदोन्नती देण्यात आली. या सर्व कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे फ्लॅग आणि पुष्पगुच्छ देऊन मंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
जिल्हा लवकर नक्षलमुक्त होईल!
By admin | Updated: December 23, 2015 01:41 IST