लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गुरूवारी रात्री व शुक्रवारी दिवसा दक्षिण भागातील तालुक्यांमध्ये तसेच उत्तरेकडील कोरची तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. यामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. अनेकांच्या घरांची पडझड झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.एटापल्ली- एटापल्ली तालुक्यात शुक्रवारी सकाळी दमदार पाऊस झाला. त्यामुळे जंगल भागातील नदी, नाल्यांना पूर आला आहे. तालुक्यातील अनेक नदी, नाल्यांवरील पुलांची उंची कमी आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने रहदारी ठप्प झाली होती. एटापल्ली-आलापल्ली मार्गावरील डुम्मी नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने सदर मार्ग शुक्रवारी बंद होता. एटापल्ली शहरातील आनंदनगरात पाणी शिरले. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांच्यासमोर बिकट समस्या उद्भवली आहे. आनंदनगरातील निर्मला पाचभाई यांच्या घरात पाणी शिरले. याच वॉर्डातील राहुल बिरमवार यांच्या घराची संरक्षण भिंत कोसळली.आलापल्ली- आलापल्ली परिसरातही दमदार पाऊस झाला. जवळपास दोन तास पावसाने झोडपून काढले.कमलापूर- कमलापूर परिसरात गुरूवारी रात्री व शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे नदी, नाल्यांना पूर आला. परिणामी वाहतूक ठप्प पडली होती. कमलापूर-रेपनपल्ली मार्गावरील नाल्याच्या पुलावरून पाणी वाहात असल्याने शेकडो गावांचा संपर्क तुटला होता. कमलापूर-दामरंचा, कमलापूर-लिंगमपल्ली मार्ग बंद पडले होते. सखल भागातील तसेच नाल्याजवळच्या शेतामध्ये पाणी साचले. त्यामुळे नुकतेच रोवलेले धानपीक वाहून गेले. कमलापूर येथील वॉर्ड क्र.२ मधील नागेश विस्तारी मंटाकूर यांचे घर पूर्णत: कोसळले. तसेच कोळसेलगुडम येथील एका व्यक्तीचे घर कोसळले.गोमणी- मुलचेरा तालुक्यातील गोमणी परिसरातही मुसळधार पाऊस झाला. गोमणी-आंबटपल्ली मार्गावरील पुलावरून दोन फूट पाणी वाहत असल्याने शुक्रवारी दुपारपर्यंत वाहतूक ठप्प पडली होती.जिमलगट्टा- जिमलगट्टा-देचलीपेठा मार्गावरील किष्टापूर नाल्यावर पूल नाही. नाल्याच्या पलिकडे २० गावे आहेत. या गावातील नागरिकांना नाल्याच्या पाण्यातून धोकादायक प्रवास करावा लागतो. या नाल्यात जवळपास पाच फूट पाणी आहे. एवढ्या पाण्यातूनही काही नागरिक खांद्यावर दुचाकी मांडून पलिकडे पोहोचवून देतात.भामरागड- भामरागड-आलापल्ली मार्गावरील कुमरगुडा नाल्याला पूर आला. पुलावरून पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प पडली. पूर कमी झाल्यानंतर वाहतूक सुरू झाली. इतरही नाल्यांवर पूर असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.कोरची- कोरची शहरातील वॉर्ड क्र.५ मधील कार्तिक देवांगण यांच्या घरात पाणी शिरले. या ठिकाणी नाली व रस्त्याचे बांधकाम झाले नाही. कोरची नगर पंचायतीची स्थापना होऊन चार वर्षांचा कालावधी उलटला. मात्र या वॉर्डांमध्ये नाली व रस्त्यांचे बांधकाम झाले नाही. वॉर्ड क्र.५ मधील रस्त्यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे रस्ता ओळखणे कठीण झाले आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. या वॉर्डातील नाली व रस्ता बांधकामाबाबत नगराध्यक्ष ज्योती मेश्राम यांना विचारणा केली असता, रस्त्याचे काम मंजूर झाले आहे. नगर पंचायतीला निधी सुद्धा प्राप्त झाला आहे. लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने कामास विलंब झाला. पावसाळा संपल्यानंतर काम होईल, असे त्यांनी सांगितले.घोट- रेगडी मार्गालगत असलेल्या वॉर्ड क्र.४ मधील हरिजन वस्तीमधील घरांमध्ये शुक्रवारी पाणी शिरले. या वस्तीजवळ पूल आहे. सदर पूल लहान आहे. त्यामुळे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला होता. परिणामी अलिकडे पाणी साचून अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले. नागरिकांनी रस्ता फोडून पाणी काढले. अनिल व्यंकटी आईलवार, किशोर व्यंकटी आईलवार, व्यंकटी मक्का आईलवार यांच्या घरात पाणी शिरले. मंडळ अधिकारी एस.व्ही.सरपे, तलाठी एन.एस.अतकरे, सरपंच विनय बारसागडे, सदस्य विलास उईके यांनी घटनास्थळाला भेट दिली.पोलिसांनी दिला मदतीचा हातएटापल्ली ते आलापल्ली मार्गावरील डुम्मी नाल्याला शुक्रवारी दुपारनंतर पूर आला. पुराची पाणी पुलावरून वाहू लागल्याने आलापल्लीवरून येणारी बस वन तपासणी नाक्याजवळच थांबली. बसमधील प्रवासी आणि शाळकरी विद्यार्थी एटापल्लीत येण्यासाठी नाल्याच्या पुलावरील पाण्यातून मार्ग काढत होते. हे पाहून तिथे उपस्थित एटापल्ली ठाण्याच्या व काही सीआरपीएफच्या जवानांनी मदतीचा हात देत त्यांना पैलतिरावर पोहोचवले. यासोबतच एटापल्लीतून आल्लीपल्लीकडे जाणाऱ्या प्रवाशांनाही मदत केली.आज अतिवृष्टीची शक्यताशुक्रवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यातील मुलचेरा (८२ मिमी), अहेरी (९६.४ मिमी) आणि सिरोंचा (६६.७ मिमी) या तीन तालुक्यात अतिवृष्टी झाली. शनिवारी पुन्हा जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. विजा कडकडत असल्यास नागरिकांनी शेतावर जाणे टाळावे. तसेच सखल भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे करण्यात आले आहे.महागाव येथील घरे कोसळलीअहेरी/महागाव- अहेरी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अहेरीपासून सात किमी अंतरावर असलेल्या महागाव येथील दोन घरे तर अहेरी येथील एक घर कोसळले आहे. महागाव येथील शिवकुमार राजेश जनगम यांचे राहते घर पहाटे ४ वाजता कोसळले. घर कोसळले तेव्हा राजेशचे कुटुंबीय घरातच होते. त्यांना बाहेर पडणे कठीण झाले होते. सुदैवाने या अपघातातून सर्वजण बचावले आहेत. मात्र त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे. महागाव येथीलच महादेव गंगा वेलादी यांच्या सुद्धा घराची भिंत कोसळली. या ठिकाणी सुद्धा जीवितहानी झाली नाही. महागाव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय अलोणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन महसूल विभागाला माहिती दिली. अहेरी येथील गडअहेरी परिसरातील मुरूमखदान येथील हिमवंत सत्यनारायण पस्पुनुरवार यांचे घर कोसळले. यात कोणतीच जीवितहानी झाली नाही.
जिल्ह्यात पुन्हा मुसळधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 06:00 IST
एटापल्ली- एटापल्ली तालुक्यात शुक्रवारी सकाळी दमदार पाऊस झाला. त्यामुळे जंगल भागातील नदी, नाल्यांना पूर आला आहे. तालुक्यातील अनेक नदी, नाल्यांवरील पुलांची उंची कमी आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने रहदारी ठप्प झाली होती.
जिल्ह्यात पुन्हा मुसळधार
ठळक मुद्देअनेक घरांची पडझड : नदी-नाल्यांच्या पुरामुळे अडले मार्ग, तीन तालुक्यात अतिवृष्टी