भामरागड : नारगुंडा येथे पोलीस विभागाच्या पुढाकाराने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात महिलांना विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी नारगुंडा पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अश्विन गजभिये, उपनिरीक्षक सचिन सानप, ज्ञानेश्वर लांडे, सागर अन्नमवार, अंगणवाडी सेविका कमला पुंगाटी, गाव पाटील बिरजू पुंगाटी, खंडी पाटील, कटिया कुडयामी आदी प्रामुख्याने हजर हाेते. पाेलीस मदत केंद्राच्या हद्दीतील नारगुंडा, खंडी, कुचेर, मुत्तेमकूही येथील ४० ते ५० महिला व २० ते २५ पुरुष यात सहभागी झाले होते.
कार्यक्रमात उपस्थित महिलांना आरोग्य, शैक्षणिक, कोरोना विषाणूबाबत व विविध योजनांबाबत मार्गदशन केले. कायद्यातील तरतुदी, शासकीय प्रशिक्षण, दादालोरा खिलाडी योजनेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. गावातील युवतींनी, विद्यार्थिंनींनी आपले पारंपरिक नृत्य सादर केले. यावेळी महिलांना बॅग, तेल पॉकेट, गोंडी भाषेतील कॅलेंडर व लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. सहभोजनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी पोमके नारगुंडा येथील पाेलीस जवान, सीआरपीएफ, एसआरपीएफचे अधिकारी, अंमलदार, महिला अंमलदार यांनी सहकार्य केले.
पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.