मुलचेरा : तालुका मुख्यालयापासून दूर अंतरावर असलेल्या गावातील नागरिकांना विविध प्रकारच्या दाखल्यांचा लाभ देण्यासाठी महसूल प्रशासनाच्यावतीने गोमणी येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात विविध प्रकारच्या ३३७ दाखल्यांचे वाटप करण्यात आले.गोमणी येथील भगवंतराव आश्रमशाळेत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन संवर्ग विकास अधिकारी आर. एम. रोकमवार यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिराच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार पी. जी. अपाले होते. प्रमुख अतिथी म्हणून तालुका कृषी अधिकारी पाटील, जिल्हा परिषद सदस्य लैजा चालुरकर, प्राचार्य गुलाबराव वसाके, मुख्याध्यापक रतन दुर्गे, उपसरपंच शंकर वंगावार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिवटीवार, हरिपद पांडे, अजय बिरमलवार, मंडळ अधिकारी पठाण, तलाठी उईके उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान पाकिस्तानच्या पेशावर येथील आर्मी स्कूलवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करून मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शिबिरादरम्यान पं. स. च्या कृषी विभाग, स्वच्छ भारत मिशन, प्राथमिक आरोग्य केंद्र सुंदरनगर, पशुवैद्यकीय विभाग, भूमीअभिलेख कार्यालयाच्यावतीने स्टॉल लावून शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. त्यानंतर शिबिरात ३० जात प्रमाणपत्र, ९८ अधिवास प्रमाणपत्र, ५२ उत्पन्नाचे दाखले, ६२ सातबारा, १७ राशनकार्ड तसेच इतर दाखल्यांचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक व संचालन नायब तहसीलदार एन. एल. कुमरे तर आभार एस. एस. भडके यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)
गोमणीत ३३७ दाखल्यांचे वाटप
By admin | Updated: December 20, 2014 22:40 IST