राज्य माहिती आयोगाचे निर्देश : आवारातील मेडिकल स्टोअरबद्दल मागितली माहितीगडचिरोली : माहितीच्या अधिकाराअंतर्गत मागितलेली माहिती देण्यास जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जन माहिती अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्याने जन माहिती अधिकारी यांचेवर शास्ती का करण्यात येऊ नये, माहिती न देण्याचा खुलासा सादर करावा, असे निर्देश राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठाने रुग्णालयाला दिले आहेत. गडचिरोली तालुक्यातील पुलखल येथील मंदीप मारोती गोरडवार यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे सरकारी दवाखान्यामध्ये असलेल्या आवारामध्ये खासगी मेडिकलकरिता दिलेल्या परवानगीबद्दल सविस्तर माहितीची सत्यप्रत तसेच शासकीय डॉक्टरांकडून खासगी मेडिकलमधील औषधी खरेदी करण्याविषयी चिठ्ठी लिहून देणे वैध आहे काय, या दोन प्रकारची माहिती मागितली होती. मात्र रुग्णालयाचे जनमाहिती अधिकारी यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. विहीत मुदतीत माहिती प्राप्त झाली नाही. त्यामुळे प्रथम अपील दाखल केले. प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांनी ७ आॅक्टोबर २०१५ रोजी सुनावणीसाठी सकाळी ११.२५ वाजता बोलविले होते. फक्त १० मिनीट वाट पाहून निघून गेले. अपिलार्थी दुपारी १.३० वाजता कार्यालयात उपस्थित झाले. तेव्हा प्रथम अपिलीय अधिकारी निघून गेले होते. प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांनी १३ आॅक्टोबर रोजी माहिती पाठविली. मात्र यामध्ये जनमाहिती अधिकाऱ्यांनी माहिती उपलब्ध करून दिली नाही. माहिती का दिली नाही, याबाबतचा आदेश १५ दिवसांत आयोगास सादर करावा, असे निर्देश राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठाने रुग्णालय प्रशासनास दिले आहेत.
माहिती देण्यास रुग्णालयाची टाळाटाळ
By admin | Updated: October 28, 2016 01:05 IST