जि. प., पं. स. निवडणूक : सर्वच राजकीय पक्षांकडून विजयाचा दावा कुरखेडा : कुरखेडा तालुक्यात पहिल्या टप्प्यात मतदान १६ फेब्रुवारी रोजी आटोपले. त्यानंतर सर्व उमेदवारांचे भाग्य इव्हीएममध्ये बंद झाले आहे. आपलाच उमेदवार या निवडणुकीत विजयी होईल, असा दावा राजकीय पक्ष व त्यांचे कार्यकर्ते करीत आहे. त्यामुळे गावागावात निवडणूक कौलाचा चर्चा जोर धरत आहे. कुरखेडा तालुक्यात पलसगड-पुराडा, तळेगाव-वडेगाव, गेवर्धा-गोठणगाव, कढोली-सावलखेडा आणि अंगारा-येंगलखेडा आदी पाच जिल्हा परिषद क्षेत्र आहेत. येथील निवडणूक प्रक्रिया पार पडली असून निकालाबाबतची उत्सुकता प्रचंड शिगेला पोहोचली आहे. जण चर्चेवरून पलसगड-पुराडा क्षेत्रात येथील प्रस्थापित नेतृत्वाला शह देण्याकरिता प्रचाराचा मोठी धुळवळ उडविण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण तालुकावासीयांचे या क्षेत्राच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. तळेगाव-वडेगाव जि. प. क्षेत्रात होणाऱ्या दुहेरी झुंजीत तिसऱ्या पक्षाने कितपत मजल मारली या बाबीवर या क्षेत्राचा निकाल अवलंबून राहणार असल्याची चर्चा सर्वत्र आहे. गेवर्धा-गोठणगाव जि. प. क्षेत्रात तालुक्याची सर्वाधिक खर्चीक निवडणूक लढली गेली. येथील सर्व उमेदवार व त्यांचे समर्थक विजयाचे गणित जुळवित छातीठोकपणे विजयाचा दावा करीत असल्याचे दिसून येते. या क्षेत्रातील निकालाच्या परिणामाबाबत भवितव्य वर्तविणे कठीण झाले आहे. कढोली-सावलखेडा क्षेत्रात प्रचाराच्या आठ दिवसांच्या कालावधीत येथील चारही प्रमुख उमेदवारांची हवा सातत्याने बदलत राहिली. येथे विजयाचा पारडा कुणाकडे झुकला, तसेच अखेरच्या दिवसात बदललेली हवेची दिशा कुणाकडे फिरली, याबाबत अनिश्चितता असली तरी येथे चौरंगी रंगतदार लढत होत असल्याची चर्चा आहे. महिलांकरिता राखीव असलेल्या अंगारा-येंगलखेडा क्षेत्रात काँग्रेस व भाजप या दोन्ही प्रमुख प्रतिस्पर्धी पक्षांना बंडखोरांचे मोठे आव्हान पेलावे लागले. काँग्रेसच्या बंडखोराने तर येथे शिवसेनेचा धनुष्यबाण उचलला होता. तर भाजप बंडखोराने रासपची उमेदवारी धारण केली होती. त्यामुळे येथे विजयाचे गणित जुळविताना उमेदवारांना तारेवरची मोठी कसरत करावी लागत आहे. (तालुका प्रतिनिधी)
कुरखेडा तालुक्यात निकालाच्या कौलावर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2017 01:29 IST