गडचिरोली : शासनाच्यावतीने अपंग कर्मचाऱ्यांना तंत्रसहाय्य उपकरणे देण्यासंदर्भात वेळोवेळी परिपत्रक निर्गमित केले असले तरी जिल्हा परिषदेच्यावतीने अपंग कर्मचाऱ्यांना तंत्रसहाय्य उपकरणापासून वंचित ठेवल्याचा आरोप अपंग कल्याण नॅशनल ट्रस्ट समितीचे सदस्य मुकुंद उंदीरवाडे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, शासनाच्या ३ जून २०११ तसेच वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये ज्या विभागामध्ये अपंग कर्मचारी कार्यरत आहेत, त्या प्रत्येक विभागाने त्यांच्या आस्थापनेवरील अपंग कर्मचाऱ्यांनी पुरवावयाच्या उपकरणांकरिता कार्यालयीन अर्थसंकल्पात आवश्यक ती तरतूद उपलब्ध करून खर्च भागवावा, अशी मागणी उंदीरवाडे यांनी केली आहे. आवश्यकतेनुसार लागणारी अतिरिक्त तरतूद सुधारित अंदाजपत्रकाद्वारे उपलब्ध करून देण्याची कार्यवाही विहित पद्धतीनुसार करावी, असेही उंदीरवाडे यांनी म्हटले आहे. जिल्हा परिषदेने ६ मार्च २०१३ च्या पत्रानुसार शासनाकडे ३३ लाख ८४ हजार रूपयाच्या निधीची मागणी केली होती. मात्र जिल्हा परिषदेमध्ये अपंग कर्मचाऱ्यांना तंत्रसहाय्य उपकरणांपासून वंचित ठेवले आहे. जिल्हा परिषदेने ३ टक्के अपंगांना लाभ द्यावा, २०१४-१५ च्या अर्थसंकल्पात ३ लाख रूपयाचा मंजूर निधी गोरगरीब अपंगांच्या कल्याणासाठी खर्च करावा, अशीही मागणी उंदीरवाडे यांनी केली आहे. सदर निधी अपंगाच्या कल्याणावर खर्च न झाल्यास अपंग कल्याण समितीच्यावतीने जिल्हा परिषद प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मुकुंद उंदीरवाडे यांनी दिला आहे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशीही त्यांनी चर्चा केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
अपंग कर्मचारी तंत्रसहाय्य उपकरणांपासून वंचित
By admin | Updated: July 19, 2014 23:56 IST