पालकमंत्र्यांचे प्रतिपादन : अपंगांसाठी मार्गदर्शन मेळावागडचिरोली : अपंग व्यक्तींनी अपंगत्वाबद्दल संकोच न बाळगता आत्मनिर्भर बनण्यासाठी स्वत:चा व्यवसाय सुरू करावा, त्यांना शासन सर्वोतपरी मदत देईल, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.सामाजिक न्याय भवन येथे महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ यांच्या सौजन्याने अपंगांसाठी कर्ज योजना व प्रशिक्षण मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. अशोक नेते होते. प्रमुख अतिथी म्हणून आ. डॉ. देवराव होळी, नगराध्यक्ष निर्मला मडके, अपंग, वित्त व विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुहास आळे, विशेष जिल्हा समाजकल्याण अधिकारी आर. के. कोलते, प्रकाश गेडाम, रवी ओल्लालवार, स्वप्नील वरघंटे, बंदसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना पालकमंत्री म्हणाले की, अपंगांना अपंग न संबोधता विशेष व्यक्ती म्हणून संबोधावे, या अपंग संघटनांच्या मागणीवर शासन विचार करीत आहे. अपंगांना सक्षम करण्याचे काम अपंग वित्त व विकास महामंडळामार्फत करण्यात येत असून याकरिता सर्व अपंगांनी एकत्रित येऊन शासनाच्या समाजकल्याण विभागाकडे नोंदणी करावी, यामुळे अपंगांचा विकास करण्यास शासनाला सुलभ जाईल. अपंगांसाठी असलेल्या योजनांची माहिती व्हावी, यासाठी ग्रामीणस्तरावर मेळाव्यांचे आयोजन करावे, असे मार्गदर्शन केले. खा. अशोक नेते यांनी अपंगांनी आपल्यात असलेले कलागुण, कौशल्य व कर्तुत्व दाखवावे, यामुळे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. त्यासाठी आपले कौशल्य समाजापुढे आणावे. अपंगांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन स्वावलंबी बनण्याची गरज आहे, असे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सुहास काळे, संचालन ज्ञानेश्वर उचे तर आभार जिल्हा व्यवस्थापक शेंडे यांनी मानले. कार्यक्रमाला समतादूत प्रकल्प अधिकारी राजन बोरकर, सामाजिक न्याय विभागाच्या विविध महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांच्यासह अपंग संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)लाभार्थ्यांना कर्ज वितरणअपंग वित्त व विकास महामंडळातर्फे वर्षा नांदगाये व सुनील मेश्राम यांना स्वयंरोजगार करण्यासाठी कर्ज मंजूर करण्यात आले. या लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले. त्याचबरोबर कर्ज घेऊन नियमित परतफेड करणाऱ्या विलास नवले, गजानन ठाकरे, जनक शाहू, सतिश किनारकर यांचा सत्कार करण्यात आला.
अपंगांनी स्वत:चा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर व्हावे
By admin | Updated: July 4, 2015 02:24 IST