संजय तिपाले लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : कन्या व पुतणे अशा कुटुंबातील दोघांनी खिंडीत पकडूनही मोठ्या फरकाने विधानसभा निवडणुकीत विजय खेचून आणणारे राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते धर्मरावबाबा आत्राम यांना मंत्रिमंडळ विस्तारात शेवटच्या क्षणी डावलण्यात आले. शिवाय पहिल्यांदाच विधानसभेत गेलेले भाजपचे डॉ. मिलिंद नरोटे यांनाही संधी मिळाली नाही. त्यामुळे धर्मरावबाबा समर्थकांसह भाजप कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. जिल्ह्यात तीनपैकी दोन जागांवर महायुतीने विजय मिळविला. सत्तारूढ सरकारच्या बाजूने कौल देऊनही मंत्रिपदाच्या बाबतीत जिल्ह्याची झोळी रितीच राहिली.
विदर्भातील राष्ट्रवादीचा (अजित पवार गट) प्रमुख चेहरा तसेच आदिवासी नेते म्हणून धर्मरावबाबा यांची ओळख आहे. सरपंच ते कॅबिनेट मंत्री असा प्रवास केलेल्या धर्मरावबाबा यांना यावेळच्या निवडणुकीत कन्या भाग्यश्री आत्राम (हलगेकर) व बंडखोरी करत पुतणे अम्ब्रीशराव आत्राम यांनी आव्हान दिले होते. त्यामुळे अहेरीतील नात्यागोत्याची लढत राज्यभर चर्चेत होती. धर्मरावबाबा यांनी आपला गड राखून वर्चस्व सिद्ध केले होते. यापूर्वी तीनवेळा राज्यमंत्रिपद, मागच्या सरकारमध्ये कैबिनेट मंत्रिपद भूषविणाऱ्या धर्मरावबाबा हे यावेळी देखील मंत्रिपदाचे दावेदार होते, पण शेवटच्या क्षणी त्यांचे नाव आश्चर्यकारकरीत्या मागे पडले.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत सन्नाटा धर्मरावबाबा आत्राम है प्रदीर्घ अनुभवी नेते आहेत. कारकिर्दीत त्यांनी आठवेळा विधानसभा निवडणूक लढवली. त्यातील तीन निवडणुकांत त्यांना हार पत्करावी लागली, पण पाचवेळा त्यांनी विजय मिळविला. मंत्रिमंडळात त्यांचा समावेश न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) कार्यकत्यांत सन्नाटा पसरला होता. मंत्रिपदाच्या अपेक्षेने अनेकांनी उपराजधानी गाठली होती, पण त्यांना निराश होऊन परतावे लागले. दुसरीकडे नवखे असले तरी भाजपचे डॉ. मिलिंद नरोटे यांना सुशिक्षित व तरुण चेहरा म्हणून संधी मिळेल, अशी समर्थकांना अपेक्षा होती, पण त्यांचाही भ्रमनिरास झाला.
पालकमंत्रिपद कोणाकडे? जिल्हा माओवादप्रभावित असला तरी आता विकासाकडे झेपायत आहे. मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत. लोह खनिज उत्खनन, त्यावर आधारित पोलाद निर्मिती प्रकल्प आकार घेऊ लागले आहेत. त्यामुळे गडचिरोलीच्या पालकमंत्रिपदाचे वेगळे महत्त्व आहे. अशा परिस्थितीत पालकमंत्रिपद कोणाकडे जाते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. शेजारच्या चंद्रपूर, गोंदिया व भंडारा जिल्ह्याचीही मंत्रिमंडळ विस्तारात पाटी कोरीच आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतःकडेच पालकमंत्रिपद ठेवतात की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा पालकमंत्री होऊन जिल्ह्याची सूत्रे आपल्या हाती घेतात, याची उत्सुकता आहे.
यापूर्वी कोणी- कोणी भूषविले मंत्रिपद ? वर्ष नाव मंत्रिपद पक्ष १९८५ बाबूराव मडावी राज्यमंत्री काँग्रेस १९९० धर्मरावबाबा आत्राम राज्यमंत्री काँग्रेस १९९४ मारोतराव कोवासे राज्यमंत्री काँग्रेस१९९९ धर्मरावबाबा आत्राम राज्यमंत्री गोंडवाना गणतंत्र पार्टी २००४ धर्मरावबाचा आत्राम राज्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस२०१४ अम्ब्रीशराव आत्राम राज्यमंत्री भाजप२०२३ धर्मरावबाबा आत्राम कॅबिनेट मंत्री राष्ट्रवादी (अजित पवार गट)