रूग्ण रेफर टू गडचिरोलीचे प्रमाण वाढले : डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त लोकमत न्यूज नेटवर्क धानोरा : स्थानिक ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रिक्तपदामुळे सद्य:स्थितीत या रुग्णालयाची आरोग्यसेवा पूर्णत: अस्थिपंजर झाली आहे. परिणामी रुग्ण धानोरा टू गडचिरोली रेफरचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. सन १९८९ ते एप्रिल २०१६ पर्यंत प्रभारी वैद्यकीय अधीक्षकाच्या भरवशावर धानोराच्या ग्रामीण रुग्णालयााची आरोग्यसेवा होती. तब्बल २७ वर्षात या रुग्णालयाला २८ प्रभारी वैद्यकीय अधीक्षक मिळाले. एकूणच ग्रामीण रुग्णालयाचा संपूर्ण भार प्रभारी वैद्यकीय अधीक्षकांवरच होता. सन २००३ ते २००५ या कालावधीत डॉ. पुरूषोत्तम मडावी तर सन २०११ ते २०१६ या कालावधीत डॉ. अनिल रूडे हे नियमित वैद्यकीय अधीक्षक म्हणून येथे कार्यरत होते. या वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यकाळानंतर धानोरा ग्रामीण रुग्णालयात रुग्ण रेफर टू गडचिरोली हे नित्याची बाब झाली आहे. मागील तीन वर्षांपासून डॉक्टर येतच नाही. आले तरी काही दिवसातच बदली करून डॉ. या रुग्णालयातून इतरत्र परत जातात. त्यामुळे किरकोळ आजारी रुग्णावरही येथे औषधोपचार होत नाही. धानोराच्या ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर नसल्याने एका बालकाचा मृत्यू झाला होता. २७ मे रोजी शनिवारला या रुग्णालयात शवविच्छेदनाची केस आली. मात्र येथे डॉक्टर उपलब्ध नसल्याने शवविच्छेदनासाठी मृतदेह गडचिरोलीला न्यावा लागला. यापूर्वी शिक्षक सीताराम तुलावी हे निवडणुकीचे काम आटोपून परत येत असताना त्यांना अपघात झाला. सदर शिक्षकास नागपूरच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सद्य:स्थितीत डॉ. कोठवार यांच्याकडे अधीक्षकांचा प्रभार सोपविण्यात आला आहे. एकच डॉक्टर कार्यरत असून डॉक्टरांची चार पदे रिक्त आहेत. रिक्तपदाने सेवा प्रभावित झाली आहे.
धानोरा रुग्णालयाची आरोग्यसेवा अस्थिपंजर
By admin | Updated: May 28, 2017 01:19 IST