प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिपादन : भीमपूर येथे समाज प्रबोधन मेळावाकोरची : गडचिरोली जिल्ह्यात एकही उद्योग नाही, सिंचनाची सोय नाही. तरीही या जिल्ह्यातील आदिवासी, दलित मोठ्या स्वाभिमानाने जीवन जगत असून त्यांचा अजुनपर्यंत कसलाही विकास झाला नाही. विदर्भाचा विकास करण्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य झाल्याशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. कोरची तालुक्यातील भिमपूर येथे भारतीय बौध्द महासभा कोरची शाखेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्ताने मंगळवारी आयोजित समाज प्रबोधन मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रतापसिंह गजभिये होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून अॅड. प्रकाश आंबेडकर, डॉ. पितांबर कोडापे, महेश राऊत उपस्थित होते. यावेळी मंचावर भारीपचे जिल्हाध्यक्ष रोहीदास राऊत, कोरचीचे नगराध्यक्ष नसरू भामानी, नंदकिशोर वैरागडे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष सियाराम हलामी, जि.प. सदस्य पद्माकर मानकर, नकूल सहारे, घनशाम अमृताल, सरपंच आरती मडावी, हंसराज बडोले आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, बाबासाहेबांची जयंती आत्मियता, श्रध्दा, विश्वास असेल तरच साजरी करा, अन्यथा देखावा म्हणून साजरी करू नका, ज्यांनी बाबासाहेबांचे विचार अंगीकारले त्यांचा विकास झाला. अंधश्रध्दा पसरविणाऱ्यांपासून सावध राहा, असे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. एससी, एसटी, ओबीसी या ६५ टक्के लोकांसाठी केवळ ५० टक्के आरक्षण आहे. उर्वरित ५० टक्के आरक्षण कुणाच्या घशात जाते, याचा विचार करणे गरजेचे आहे. बाबाहेबांचे विचार घराघरात पोहोचविण्याची जबाबदारी युवकांनी पार पाडावी. भाकरीपेक्षा स्वाभिमानाला महत्त्व देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सदैव तेवत ठेवा, असेही ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी महेश राऊत, डॉ. कोडापे, रोहीदास राऊत यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बौध्द महासभा कोरचीचे तालुकाध्यक्ष नकूल सहारे, संचालन हिरामन मेश्राम, जीवन भैसारे यांनी केले तर आभार शालिक कराडे यांनी मानले. कार्यक्रमादरम्यान दोन जोडप्यांचा विवाह लावून देण्यात आला. यशस्वीतेसाठी किशोर साखरे, देवराव गजभिये, हिरा राऊत, महेश लाडे, सहारे, श्रावण अंबादे, रामदास साखरे, पंकज बोरकर, जयदेव सहारे, पंढरी उंदीरवाडे, बसूराज लाडे, गौतम चौधरी, भिमराव कराडे, वसंत कराडे, शंकर जनबंधू, छगन चौधरी, मदन सहारे, आनंद राऊत, रामचंद्र राऊत, अंकालू नंदेश्वर, रमेश सहारे, चंद्रशेखर अंबादे, कपूरचंद उंदीरवाडे आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाला कोरची तालुक्यातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
स्वतंत्र विदर्भाशिवाय विकास शक्य नाही
By admin | Updated: April 20, 2016 01:34 IST