अधिकाऱ्यांसोबत चर्चा : कृषी विज्ञान केंद्राला भेटगडचिरोली : जिल्ह्यातील तलाव व नद्यांमध्ये बारमाही पाणी राहते. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात मत्स्य व्यवसायाला अतिशय पोषक वातावरण आहे. मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी मत्स्य विज्ञान केंद्राची स्थापना करण्याचा विचार शासनस्तरावरून सुरू आहे. सदर केंद्र सुरू करण्याबाबत गुरूवारी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.यावेळी जिल्हाधिकारी नायक यांनी कृषी विज्ञान केंद्रास भेट देऊन या परिसराची पाहणी केली. यावेळी केंद्राचे कार्यक्रम समन्वयक व्ही. जे. तांबे, आत्माचे अधिकारी पवार, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य अमर शेट्टीवार, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तलाव व नद्यांची संख्या आहे. या जलसाठ्यांमध्ये वर्षभर पाणी राहते. त्यामुळे मत्स्य व्यवसायाला अतिशय पोषक वातावरण गडचिरोली जिल्ह्यात आहे. मत्स्य उत्पादनाला चालना देण्यासाठी गावकऱ्यांना त्याबाबतची माहिती व सुविधा पुरविण्याची गरज आहे. ही माहिती पुरविण्यासाठी जिल्हास्तरावर केंद्र स्थापन केले जाणार आहे. कृषी विज्ञान केंद्राचा परिसर खूप मोठा आहे. त्यासोबत आत्मा प्रकल्पाची सांगड घातल्यास प्रशिक्षण व प्रात्यक्षिक एकाच ठिकाणी मिळू शकणार आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण व्यवस्था अधिक मजूबत होण्यास मदत होईल, असा आशावाद जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.कृषी महाविद्यालयाची इमारत तयार झाली आहे. मात्र तांत्रिक अडचणीमुळे महाविद्यालय स्थलांतरित झाले नाही. लवकरातलवकर कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. धानपिकासंदर्भात करण्यात आलेल्या विविध प्रयोबाबतचे सादरीकरण जिल्हाधिकाऱ्यांसमोर करण्यात आले. (नगर प्रतिनिधी)
मत्स्य विज्ञान केंद्र सुरू करण्यासाठी चाचपणी
By admin | Updated: October 17, 2016 02:08 IST