१० कोटींचा निधी मंजूर : संरक्षण भिंत, गुड्स शेड, यात्री शेड, शौचालय व फलाटाची दुरूस्तीदेसाईगंज : रेल्वे विभागाच्या वतीने देसाईगंज रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरण व दुरूस्तीसाठी दहा कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून नोव्हेंबर २०१५ पासून दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या दुरूस्तीनंतर रेल्वे प्रवाशांना सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत. सदर काम तत्काळ करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.गडचिरोली जिल्ह्यातून केवळ १७.५ किमी एवढ्या अंतरातून रेल्वे जाते. देसाईगंज येथे एकमेव रेल्वे स्थानक आहे. रेल्वेस्थानकाला दर वर्षी कोट्यवधी रूपयांचे उत्पन्न प्राप्त होत असले तरी या रेल्वे स्थानकाच्या दुरूस्तीकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत होते. याचा फटका रेल्वे प्रवाशांना बसत होता. त्यामुळे रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण करण्याची मागणी होत होती. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने १० कोटी रूपयांचा निधी मंजूर करून दुरूस्तीचे काम नोव्हेंबर २०१५ पासून हाती घेण्यात आले आहे. रेल्वे लाईनची दुरूस्ती, रेल्वे स्थानकातील नाल्यांवरील पुलांचे बांधकाम, रेल्वे फलाटाची उंची वाढविणे, रेल्वे स्थानकाच्या सभोवताल संरक्षण भिंती बांधणे, दोन फ्लायओवर पूल, गोदाम, यात्री शेड, शौचालय आदींचे बांधकाम व दुरूस्तीचे काम सुरू झाले आहे. हे सर्व बांधकाम झाल्यानंतर रेल्वे प्रवाशांना सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत. देसाईगंज रेल्वे स्थानकावर प्रवाशांची नेहमीच गर्दी राहते. मात्र रेल्वे स्थानकाच्या वतीने स्वच्छतेबाबत फारशी काळजी घेतली जात नाही. त्यामुळे रेल्वे स्थानकाच्या सभोवताल दुर्गंधी पसरली असल्याचे चित्र दिसून येते. रेल्वे पलाटावर मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला आहे. या परिसरातील दुर्गंधीचा त्रास रेल्वे प्रवाशांना होत आहे. देशभरात स्वच्छतेची मोहीम राबविली जात असताना देसाईगंज रेल्वे स्थानक मात्र यापासून अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे. रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानक परिसरात स्वच्छता ठेवण्यासाठी अधिकचे कर्मचारी नेमून त्यांच्याकडून स्वच्छतेचे काम व्यवस्थित करून घेणे आवश्यक असतानाही याकडे दुर्लक्ष होत आहे. रेल्वे स्थानकाच्या दुरूस्तीनंतर तरी स्वच्छता बाळगली जाईल, अशी आशा रेल्वे प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी) सहा महिने उलटूनही २० टक्के कामरेल्वे स्थानक दुरूस्तीच्या कामाला नोव्हेंबर २०१५ मध्ये सुरुवात झाली. काम सुरू होऊन सहा महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी केवळ २० टक्के काम पूर्ण झाले आहे. काम करण्याची गती अतिशय संथ आहे. दुरूस्तीसाठी लागणारे साहित्य रेल्वे स्थानकावर आणून ठेवण्यात आले आहेत. याचा त्रास या ठिकाणी येणाऱ्या रेल्वे प्रवाशांना होत आहे. रेल्वेमधून उतरविलेला सामान ठेवण्यासाठी रॅक पार्इंटवर जागा उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक मालवाहू रेल्वे गाड्या या ठिकाणी थांबविण्यास बंदी घातली जात आहे. दर महिन्याला धान्याचा पुरवठा गडचिरोली जिल्ह्याला करण्यासाठी देसाईगंज येथील रेल्वे स्थानकावर मालगाड्या थांबविल्या जातात. मात्र याही रेल्वे गाड्या थांबविण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाची अडचण वाढली आहे. माल उतरविण्याची अडचण व प्रवाशांना होणारी गैरसोय लक्षात घेऊन रेल्वे स्थानक दुरूस्तीच्या कामाला गती देऊन हे काम तत्काळ करण्यात यावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
देसाईगंज रेल्वे स्थानकाचे रूप पालटणार
By admin | Updated: April 29, 2016 01:38 IST