गडचिरोली : काही दिवसापूर्वी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये डेंग्यू व हिवताप रोगांची साथ आली होती. पावसाळ्याच्या दिवसात या रोगाची साथ अधिक पसरण्याची शक्यता असते. पावसाळ्यात अशा रोगांच्या साथीपूर्वीच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्हा आरोग्य व हिवताप विभागाच्यावतीने जुलै महिना हा डेंग्यू प्रतिबंधक महिना म्हणून पाळण्यात येणार आहे. या कालावधीत आरोग्य कर्मचारी शाळांमध्ये जाऊन संवेदक म्हणून साथ रोगाबाबत जनजागृती करणार आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्रीराम गोगुलवार व जिल्हा हिवताप अधिकारी आर. बी. ढोले यांनी सोमवारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.यावेळी माहिती देतांना डॉ. श्रीराम गोगुलवार म्हणाले, गतवर्षी जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागाच्यावतीने ५० हजार ५०१ मच्छर दानीचे वितरण करण्यात आले. यावर्षी पावसाळ्याच्या दिवसात साथरोग उद्भवू नये यासाठी आरोग्य विभागाने नियोजन केले आहे. यंदा डेंग्यू प्रतिबंधक म्हणून पाळल्या जाणाऱ्या जुलै महिन्यात ६ लाख ५४ हजार लोकसंख्येसाठी एकूण १ हजार ३२७ गावांमध्ये हिवताप जिल्हा कार्यालयामार्फत घरांमध्ये फवारणी करण्यात येणार आहे. या फवारणीची सुरूवात २५ जूनपासून सुरू झाली असल्याचीही माहिती डॉ. श्रीराम गोगुलवार यांनी यावेळी दिली.कमी वेळात योग्य फवारणी व्हावी, यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने यंदा फवारणीसाठी नवीन पंप खरेदी करण्यात आले आहे. रक्त नमुने घेतल्यानंतर तत्काळ निदान व्हावे, यासाठी यंदा आरोग्य विभागाच्यावतीने आरडीके किट उपलब्ध करण्यात आले आहे. सदर किट जिल्ह्यातील सर्व नर्सेस, आरोग्य सेवक तसेच आशा वर्कर यांच्याकडे उपलब्ध आहे. या किटमुळे केवळ १५ ते २० मिनीटात हिवतापाचे निदान होणार आहे, अशी माहिती डॉ. गोगुलवार यांनी दिली. डेंग्यू प्रतिबंधक महिना म्हणून पाळल्या जाणाऱ्या जुलै महिन्यात जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचारी नेमून दिलेल्या शाळांमध्ये जाऊन डेंग्यू व साथरोगाची माहिती विद्यार्थ्यांना देतील. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना, रोग झाल्यानंतर करावयाची उपाययोजना तसेच रोग उद्भवू नये यासाठी ठेवावयाची स्वच्छता याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. १०० मुलामागे १ संवेदक म्हणून आरोग्य कर्मचारी या महिन्यात काम करणार आहे. याबाबतचा अहवाल संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीने आरोग्य विभागाला प्राप्त होणार आहे, असेही डॉ. गोगुलवार यांनी यावेळी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)
डेंग्यू प्रतिबंधक महिना पाळणार
By admin | Updated: July 1, 2014 01:28 IST