देसाईगंज : तालुक्यात डेंग्यू आजाराच्या डासांचा प्रकोप वाढला असून देसाईगंज शहरात दोन तर तालुक्यातील कोरेगाव येथे एक डेंग्यू सदृश्य रूग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागात खळबळ निर्माण झाली आहे. डेंग्यू व इतर रोगाबाबत तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्व ग्रामपंचायतींना स्वच्छतेच्या सूचना देखील केल्या आहेत़ मात्र आरोग्य विभागाच्या या सुचनेकेडे ग्रामपंचायत व नगर परिषद प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. डेंग्यूचा आजार अतिशय धोकादायक आहे. या आजारावर तात्काळ उपचार न केल्यास रूग्ण दगावण्याची शक्यता असते. या आजाराचे गांभीर्य निदर्शनास आल्यामुळे राज्य शासनाने ज्या ठिकाणी डेंग्यूचे आजारी आढळतील त्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक व ईतर जबाबदार अधिकाऱ्यांचे त्या वर्षाचे वेतन स्थगित करण्याचा आदेशही दिला आहे़ शासनाचे सक्त निर्देश असताना देखील प्रशासकीय अधिकारी डेंग्यू आजाराबाबत उदासीन असल्याचे दिसून येते. शहरातील खासगी पॅथालॉजी केंद्रात डेंग्यूच्या तपासणीची किट उपलब्ध आहे. यामुळे अनेक नागरिक खासगी पॅथालॉजी केंद्राचा आधार घेतात. जिल्हा आरोग्य विभागाने देसाईगंज शहर व तालुक्यात आरोग्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)
देसाईगंजात डेंग्यूचा प्रकोप
By admin | Updated: August 10, 2014 22:59 IST