आरमोरी, गडचिरोली क्षेत्र : काँग्रेस निरीक्षकांनी घेतला आढावा गडचिरोली : लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने आज गडचिरोली व आरमोरी विधानसभा क्षेत्रात केंद्रीय व राज्यपातळीवरून निरिक्षक पाठवून या मतदार संघातील परिस्थितीचा आढावा घेतला. गडचिरोलीत विद्यमान आमदारासह तब्बल सात जणांनी उमेदवारीसाठी दावेदारी केली. तर आरमोरीत केवळ दोघांनीच उमेदवारीसाठी शक्तिप्रदर्शन केले.गडचिरोलीत निरीक्षकाच्या आगमन प्रसंगीच गटबाजीचे जाहीर प्रदर्शन करण्यात आले. त्यानंतर निरीक्षकांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जिल्हाध्यक्षाविरोधातील भावना जाणून घेतल्यानंतर कार्यकर्त्यांचा राग शांत झाला. काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक म्हणून उत्तर प्रदेशचे आमदार नदीम जावेद व प्रदेश काँग्रेस कमिटीचे गडचिरोली जिल्हा समन्वयक संजय दुबे सोमवारी आरमोरी व गडचिरोलीत काँग्रेस कार्यकर्त्यांना भेटले. आरमोरी येथे विद्यमान काँग्रेस आमदार यांच्या समर्थकांनी त्यांनाच पुन्हा उमेदवार द्यावी, अशी जोरदार मागणी केली. तर एका सेवानिवृत्त सनदी अधिकाऱ्यांच्यावतीनेही काही समर्थकांनी उमेदवारीसाठी दावा दाखल केला आहे. येथे विश्रामगृहावर निरिक्षकांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवींद्र दरेकर, सहकार नेते प्रकाश पोरेड्डीवार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांच्यासह आरमोरी वगळता सर्व तालुका काँग्रेसचे पदाधिकारी भेटलेत. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हसन गिलानी हे ही उपस्थित होते. त्यानंतर गडचिरोली येथील विश्रामगृहात निरीक्षकांनी संभाव्य उमेदवारांशी चर्चा केली. यावेळी विद्यमान आमदारांसह पाच उमेदवारांनी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी आपला दावा दाखल केला. यामध्ये जिल्हा परिषदेचा गटनेता तसेच महाराष्ट्र महिला प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा, प्रदेश सचिव यांचाही समावेश आहे. यावेळी निरीक्षकांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील तिनही तालुक्यातील काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी विश्रामगृहात बंदद्वार चर्चा केली. काहींनी माजी खासदारांना विधानसभेची उमेदवारी द्या, अशीही मागणी निरिक्षकांकडे केली.यावेळी जिल्हाध्यक्ष हसनअली गिलानी, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश अर्जुनवार, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष भावना वानखेडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव सगुणा तलांडी, जेसा मोटवानी पंकज गुड्डेवार, बंडू उर्फ विनोद शनिवारे, नगरसेवक निलोफर शेख, लता मुरकुटे, नंदू कायरकर, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे प्रमुख अतुल मल्लेलवार, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष कुसूम आलाम, जिल्हा परिषदेचे काँग्रेस गटनेते केसरी उसेंडी, विलास कोडाप, एन. बी. वटी आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
गटबाजीचे प्रदर्शन; सात दावेदार
By admin | Updated: July 21, 2014 23:50 IST