आरमोरी : स्थानिक सुभाष चौकातील सार्वजनिक झेंड्यावर तसेच रस्त्यावर सुरेश एकनाथ कुंभारे यांनी अतिक्रमण केले असून सदर अतिक्रमण तत्काळ हटविण्यात यावे, अशी मागणी गावातील नागरिकांनी सरपंच व सचिव यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.सुभाष चौकात सुरेश कुंभारे यांचे घर आहे. यावर्षी त्यांनी नवीन घर बांधकामास सुरुवात केली आहे. घराचे बांधकाम करताना त्यांनी नालीला ओलांडून बांधकाम सुरू केले आहे. या चौकात सार्वजनिक झेंडा आहे. या झेंड्यावरही अतिक्रमण केले आहे. त्यामुळे भविष्यात झेंड्याचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. सुभाष चौकात मुख्य बाजारपेठ आहे. त्यामुळे या चौकात नागरिक व वाहनांची नेमहीच गर्दी राहते. कुंभारे यांनी रोडवर सुमारे तीन फुटाचे अतिक्रमण केले आहे. त्यामुळे या चौकातून नेहरू चौकाकडे जाणाऱ्या वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. सार्वजनिक झेंड्यावर अतिक्रमण केल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. सुरेश कुंभारे यांचे अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी ग्राम पंचायतीला दिलेल्या निवेदनातून बाबुराव धकाते, सुरेंद्र बेहरे, ए. जी. हेमके, मुकेश कुंभारे, ओमकार इनकणे, दिलीप हर्षे, ईश्वर हिरापुरे, बिन्नी जाधव, वामन करडे, अरूण हिरापुरे यांनी केली आहे. अतिक्रमण न हटविल्यास ग्राम पंचायतीसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गावातील नागरिकांनी दिला आहे.अतिक्रमण हटविण्याबाबत ग्राम सचिवांनी कुंभारे यांना नोटीस बजावली असतानाही ग्राम पंचायतीला न जुमानता कुंभारे यांनी अनाधिकृत बांधकाम सुरूच ठेवले आहे. विशेष म्हणजे कुंभारे हे शिक्षक असतानाही अवैध काम करीत आहेत.
आरमोरीतील सुभाष चौकातील अतिक्रमण हटविण्याची मागणी
By admin | Updated: April 27, 2015 01:15 IST