आंदोलनाचा इशारा : कसनसूर येथे १३ ग्राम पंचायतीची झाली संयुक्त ग्रामसभाएटापल्ली : तालुक्यातील कसनसुर येथे ९ नोव्हेंबर रोजी सोमवारला कसनसूर तालुका निर्माण कृती समितीच्या वतीने १३ ग्राम पंचायतीच्या गावांची संयुक्त ग्रामसभा बोलाविण्यात आली. या दुष्काळ परिस्थितीवर सखोल चर्चा करून शासनाने गडचिरोली जिल्हा १०० टक्के दुष्काळग्रस्त घोषित करावा, असा एकमुखी निर्णय घेण्यात आला. या निर्णयासाठी सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धारही या सभेत करण्यात आला. सदर संयुक्त ग्रामसभेला मार्गदर्शक म्हणून युवा नेते संतोष आत्राम होते. अध्यक्षस्थानी कसनसूरच्या सरपंच कमल ठाकरे होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून छत्तीसगडचे सुखरंजन उसेंडी, गोसू हिचामी, रामचंद्र सुरगोनीवार, कसनसुरचे उपसरपंच देवूजी गावडे, दामोधर नरोटे, पोलीस पाटील रैजी मडावी, घोटसुरचे सरपंच प्रकाश हेडो, कोतुराम पोटावी आदी उपस्थित होते. शेतीचे पुनर्सर्वेक्षण करून नव्याने जिल्हा १०० टक्के घोषित करावा, प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढण्यात यावे, अहेरी, गडचिरोली आगारामार्फत घोटसूर गावासाठी मुक्कामी बस सुरू करावे, कसनसूर येथे ३३ केव्हीचे उपकेंद्र देण्यात यावे, बीपीएल यादीचे पुनर्सर्वेक्षण करण्यात यावे तसेच पेसा अंतर्गत गावात ग्रामसभा बळकट करून शासकीय योजना राबविण्यासाठी सर्वच ग्रामसभांना कायदेविषयक सल्ला देण्यात यावा, आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, अन्यथा सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याचे यावेळी ठरविण्यात आले. संयुक्त ग्रामसभेला ७६ गावातील बहुसंख्य नागरिक हजर होते. (तालुका प्रतिनिधी)
दुष्काळ घोषित करण्याचा निर्णय
By admin | Updated: November 11, 2015 00:48 IST