नवी सुरुवात : राज्यातील सामाजिक बदलाचे पडसाद गडचिरोली : राज्यात अनेक मंदिराच्या गाभाऱ्यात व चबुतऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी संघर्ष सुरू आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर काही मंदिरांनी महिलांसाठी गाभारे खुले केले आहे. या सामाजिक बदलाचे पडसाद गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यातही शुक्रवारी दिसून आले. हनुमान जंयतीच्या निमित्ताने अनेक महिला हनुमान मंदिरांमध्ये दर्शनासाठी रांगांमध्ये लागलेल्या दिसल्या तर अनेक महिलांनी हनुमानाच्या मूर्तीजवळ जाऊनही दर्शन घेतल्याचे दिसून आले. गडचिरोलीनजीकच्या सेमाना देवस्थानात हनुमान जयंतीचा मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो. या मंदिरात सर्व जाती धर्माच्या लोकांना बाराही महिने प्रवेश दिला जातो. महिलांनाही प्रवेशासाठी कधीही मनाई करण्यात आली नाही. परंतु अनेकदा महिला मूर्तीजवळ जाऊन प्रवेश घेताना दिसत नव्हत्या. मूर्तीच्या समोर असलेल्या पिल्लरवर मंदिराच्या वतीने बोर्ड लावण्यात आला आहे. या बोर्डावर कृपया महिलांनी हनुमानाच्या मूर्तीला हात लावू नये, लांबून दर्शन घ्यावे, अशी सूचना लिहिण्यात आली आहे. मात्र शुक्रवारी भाविकांची प्रचंड गर्दी दर्शनासाठी असतानाही महिलांची स्वतंत्र रांग गाभाऱ्यात (सभागृहात) दिसून आली. अनेक महिला हाती पुजेचे ताट घेऊन असल्याचेही दिसले. काही महिलांनी रूईच्या फुलांचा हारही सोबत आणला होता, असे दिसून आले. काही महिलांनी या ठिकाणी स्वयंसेवकाच्या भूमिकेत असलेल्या श्री सत्यसाई सेवा संघटनेच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हातात हार देऊन मूर्तीवर टाकण्यास सांगितले. एकूणच राज्यस्तरावर मंदिर व गाभाऱ्याच्या प्रवेशाचा वाद सर्वत्र दिसून येत असताना हनुमानाच्या मूर्तीचे दर्शन घेऊन महिलांनी नारीशक्तीचा विजय असल्याचे शुक्रवारी अधोरेखांकीत केले. या सामाजिक बदलाची पुरूष भाविकांमध्ये मोठी चर्चा होती. (जिल्हा प्रतिनिधी)
हनुमानाच्या दर्शनाला शहरात महिलांचीही गर्दी
By admin | Updated: April 23, 2016 01:13 IST