गडचिरोली : सक्षम भारताची निर्मिती करण्यासाठी चारित्र्यसंपन्न समाज निर्माण करण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन प्रा. विवेक सरपटवार यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गडचिरोली नगराच्यावतीने रविवारी सायंकाळी विद्याभारती कन्या विद्यालयात विजयादशमी उत्सव व शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. सरपटवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून प्रजापिता ब्रम्हकुमारी गडचिरोलीचे सेवक भास्कर राऊत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक घिसूलाल काबरा, नगर संघ चालक उकंडराव राऊत उपस्थित होते. पुढे बोलताना प्रा. सरपटवार म्हणाले की, २१ व्या शतकात सामर्थ्यशाली व वैभवशाली भारताकडे संपूर्ण भारताचे लक्ष लागले आहे. या देशाची संस्कृती व संस्कार साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेत आहे. देशात राहणाऱ्या सर्वांनी राष्ट्रध्वज व राष्ट्रचिंतन करणे महत्वाचे आहे. राष्ट्रगीताचा प्रत्येक नागरिकाने सन्मान केला पाहीजे. हक्काची जाणीव ठेवून कर्तव्य पार पाडण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहीजे. सर्व धर्मांचा सन्मान करणारा हिंदूस्तान आहे. भारतीय नारी, चारित्र्यसंपन्न आहे. मात्र सध्या सर्वत्र स्त्रिची विटंबना होतांना उघड्या डोळ्यांनी दिसत आहे. हे थांबविण्यासाठी चारित्र्यसंपन्न समाज निर्मिती गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. संचालन नगर कार्यवाह दिलीप म्हस्के, प्रास्ताविक व आभार उकंडराव राऊत यांनी मानले. शहरातील प्रमुख मार्गाने स्वयंसेवकांनी पथसंचलन केले. (नगर प्रतिनिधी)
चारित्र्यसंपन्न समाजाची निर्मिती करा
By admin | Updated: October 6, 2014 23:13 IST