देचलीपेठा : परिसरातील तरंगसेवा बंद आहे. त्याचबरोबर मोबाईलला जमिनीवरून कव्हरेज मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना झाडावर चढून फोन करावा लागत आहे. यामुळे देचलीपेठा परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून जवळपास दोन हजार मोबाईल केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. अहेरी तालुक्यातील देचलीपेठाचा परिसर अतिशय दुर्गम भाग मानला जातो. या परिसरातील नागरिकांना बीएसएनएलने तरंगसेवा उपलब्ध करून दिली आहे. मात्र सदर सेवा मागील दीड महिन्यांपासून बंद आहे. या परिसरातील बहुतांश नागरिक तरंगसेवेच्या माध्यमातूनच संपर्क साधत असल्याने तरंगसेवा तत्काळ दुरूस्त करण्यात यावी, अशी मागणी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. मात्र दीड महिन्यांचा कालावधी लोटूनही ही सेवा पूर्ववत सुरू झाली नाही. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. देचलीपेठा परिसरात जवळपास दोन हजार मोबाईल ग्राहक आहेत. मात्र या भागात मोबाईल टॉवर नसल्याने कव्हरेजची समस्या गंभीर आहे. अनेक नागरिकांना इमारत व झाडावर चढून फोन करावा लागत आहे. या ठिकाणी टॉवर उभारण्याची मागणी आहे.
देचलीपेठात झाडावरून शोधावा लागतो कव्हरेज
By admin | Updated: March 2, 2015 01:22 IST