देसाईगंजात उमेदवारांना केले मार्गदर्शन : दैनंदिन खर्च भरण्यासाठी झाली सोयदेसाईगंज : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांनी अॅपच्या माध्यमातून निवडणूक खर्च निवडणूक विभागाकडे कशा पद्धतीने सादर करावा, याबाबतचे प्रशिक्षण देसाईगंज तहसील कार्यालयात गुरूवारी देण्यात आले. राज्य निवडणूक आयोगाने ट्रू व्होटर मोबाईल अॅप्लिकेशन विकसित केले आहे. सदर अॅप्लिकेशन मतदारांच्या सुविधेकरिता आहे. याद्वारे मतदारांना मतदार यादीत नावाचा शोध घेणे, प्रभाग व मतदान केंद्राची माहिती मिळविणे, मतदान केंद्राकडे मार्गक्रमनाची गुगल मॅपद्वारे माहिती, केवायसी, व्होटरवाईस व निवडणुकीचा निकाल उपलब्ध करून देण्याची सुविधा आहे. याच अॅपमध्ये उमेदवारांना त्यांचा उमेदवारी खर्च भरण्याचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. निवडणूक खर्च याच अॅपवर भरणे बंधनकारक आहे. सदर अॅप आॅनलाईन काम करणार आहे. पहिल्यांदाच अॅपच्या मदतीने निवडणूक खर्च सादर करावा लागणार असल्याने उमेदवारांचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे देसाईगंज तहसील कार्यालयाच्या वतीने उमेदवारांना निवडणूक खर्चाची माहिती कशा पद्धतीने अॅपवर सादर करावी, याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणाला देसाईगंज तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक नासिर हाशमी यांनी दिले. या प्रशिक्षणामुळे उमेदवारांना खर्च सादर करण्याबाबतच्या तांत्रिक बाबी माहित पडणार आहेत. असा करा निवडणूक खर्च सादरस्मार्ट फोन मधील प्लेस्टोअरमधून ट्र्यू व्होटर अॅप डाऊनलोड करावा, त्यानंतर या अॅपचे स्वत:च्या नावाने रजिस्ट्रेशन करून घ्यावे, रजिस्ट्रेशन करताना एआयएसपीएल सपोर्ट नंबरमध्ये ९४२२९१२४९१ हा मोबाईल क्रमांक नोंदवावा, अधिक माहितीसाठी ०७१३७-२७२७४४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अॅपवरूनही खर्च सादर होणार
By admin | Updated: February 3, 2017 01:16 IST