पावसाची दांडी : पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडवैरागड : गतवर्षीच्या खरीप हंगामात सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस व आॅक्टोबर महिनाच्या सुरूवातीला जोरदार पाऊस झाल्याने ऐन कापणीला आलेल्या शेतकऱ्यांच्या धानपीकाचा बहर अतिपावसामुळे नष्ट झाला होता. यामुळे धानपीकाच्या उत्पादनात कमालीची घट झाली होती. यंदाच्या खरीप हंगामात सप्टेंबर महिन्याच्या ११ तारखेपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. गेल्या महिनाभरापासून वरूणराजाची वक्रदृष्टी असल्याने धानपीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असल्याचे दिसून येते. तसेच जिल्हाभरातील हलके धानपीक सध्या अखेरच्या घटका मोजत असल्याचे दिसून येते. पावसाळ्याच्या प्रारंभी आणि मध्यंतरीच्या काळात पावसाने उसंत घेतली होती. मात्र त्यानंतर बऱ्यापैकी पाऊस झाल्याने जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी लगबगीने धानपीकाची रोवणी आटोपून घेतली. ऐन धानपीक बहराला येत असताना पावसाने आॅगस्ट महिन्यापासून कायमचा निरोप घेतला आहे. मध्यंतरीचे १५ दिवस पूर्णत: कोरडे गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली. त्यानंतर मात्र गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्थीपर्यंत या १० दिवसाच्या कालावधीत जिल्हाभरात दमदार पावसाने हजेरी लावली. या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील नदी, नाले, तलाव, बोड्या पाण्याने भरले. यामुळे यंदा भरघोष पीक येण्याची आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती. मात्र आॅगस्ट महिन्याच्या ११ तारेखपासून पावसाने कायमची दडी मारली आहे. कमी मुदतीचे हलके धानपीक सध्या लोंबाला आले आहेत. परंतु पाण्याअभावी जिल्ह्यातील शेकडो हेक्टर वरील धानपीक सध्या करपायला लागले आहेत. तोंडात आलेला घास वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी धावपळ सुरू केली आहे. (वार्ताहर)
करपतेय धानपीक !
By admin | Updated: October 6, 2014 23:11 IST